Sun, Mar 29, 2020 00:26होमपेज › Belgaon › कर्नाटक : अपक्ष गळाले; नाराज ‘गळा’ला?

कर्नाटक : अपक्ष गळाले; नाराज ‘गळा’ला?

Published On: Jan 15 2019 10:58PM | Last Updated: Jan 16 2019 1:37AM
बंगळूर : प्रतिनिधी

दोन अपक्ष आमदारांनी कर्नाटकातील काँग्रेस-निजद आघाडी सरकारचा पाठिंबा मंगळवारी काढून घेतला. यामुळे संक्रांतीनंतर कर्नाटक सरकारवर ‘संक्रांत’ येण्याचा भाजपने दिलेला इशारा खरा ठरणार का, हा प्रश्‍न आहे. काँग्रेसचेही काही आमदार भाजपच्या संपर्कात असून, सध्या ते महाराष्ट्र सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत असल्याचे समजते. त्यामुळे तेही भापजपच्या गळाला लागले आहेत का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दोन अपक्षांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळणार नसल्याचा विश्‍वास व्यक्त केला आहे.

राणेबेन्नूरचे (जि. दावणगिरी) आमदार व माजी वनमंत्री आर. शंकर  आणि कोलारमधील मुळबागिलूचे अपक्ष आमदार एच. नागेश यांनी आज सरकारचा पाठिंबा काढून घेतला. शंकर यांना काही दिवसांपूर्वी मंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. यामुळे ते नाराज होते. तर, नागेश यांनी सरकारकडून योग्य  कारभार होत नसल्याने पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला आहे. काँग्रेस-निजद आणि अपक्ष असे आमदार मिळून आघाडी सरकारचे संख्याबळ 120 होते. आता ते 118 वर आले आहे. काही दिवसांपासून भाजपकडून ऑपरेशन कमळ राबविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मंत्रिपदावरून हटविल्यानंतर गोकाकचे (जि. बेळगाव) आमदार रमेश जारकीहोळी समदु:खी आमदारांसह दिल्लीत ठाण मांडून आहेत. त्यामुळे किमान 17 आमदारांना राजीनामा देण्यास भाग पाडण्याची सूचना भाजप वरिष्ठांनी जारकीहोळींना दिली होती. त्यानुसार ते तयारीला लागले आहेत.आणखी काही काँग्रेस आमदार मुंबईतील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून योग्य सुरक्षा देण्यात आल्याचे समजते. गूढरित्या सर्व डावपेच आखण्यात आल्याने संबंधित आमदारांबद्दल अधिक माहिती उघडकीस आलेली नाही.

सरकार कोसळणार?

सध्या काँग्रेस आणि निजद आघाडी एकूण आमदार 120 होते. त्यापैकी दोघांनी पाठिंबा काढून घेतल्याने ही संख्या 118 झाली आहे. भाजप आमदारांची संख्या 104 आहे. केपीजेपी, बसप, अपक्ष प्रत्येकी एक आणि एक सरकारनियुक्त आमदार आहेत.

निजद आमदारांवर नजर

दोघा अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी निजदमधील सर्व आमदारांना संघटित राहण्याचे आवाहन केले आहे. सरकार स्थिर असून कोणत्याहीवेळी आमिषांना बळी पडू नये, अशी सूचना दिली आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्याचे एस. आर. महेश, बंडेप्पा काशमपूर आणि सी. एस. पुट्टराजू यांना सांगण्यात आले आहे. आमदारांच्या नियमित संपर्कात राहणे, त्यांनी पदाचा राजीनामा देऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना कुमारस्वामींनी दिल्या आहेत.

सभापती दौर्‍यावर

नाराज आमदार रमेश जारकीहोळींसह पाच आमदारांनी मुंबई गाठली आहे. तेथील एका हॉटेलमध्ये त्यांनी वास्तव्य केले आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे समजते. ते काँग्रेसच्या संपर्काबाहेर गेले आहेत. 

आमदारांनी राजीनामे दिले तर विधानसभा सभापती रमेशकुमार यांच्याकडे द्यावे लागतील. त्यामुळे त्यांनाच दौर्‍यावर पाठविण्याचा निर्णय काँग्रेस वरिष्ठांनी घेतला आहे. त्यांच्या दौर्‍यामुळे दोन ते तीन दिवस आमदारांचे राजीनामे टाळता येतील. या काळात काही आमदारांची मनधरणी करता येईल. शिवाय भाजपमधील काही आमदारांना आमिष दाखवून आमदार देण्यास भाग पाडता येणे शक्य असल्याचा हिशोब काँग्रेसने घातला आहे.

दोन अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्याने कोणतीही समस्या नाही. सरकार स्थिर आहे. काँग्रेस-निजद आघाडी सरकारमधील कुणीही राजीनामा देणार नाही.
-कुमारस्वामी, मुख्यमंत्री

देशाचे चौकीदार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले उदाहरण देतात. आज कर्नाटकातील आमदारांना हॉटेलमधील एका खोलीत कोंडून त्यांचे चौकीदार बनले आहेत.
- सिद्धरामय्या, अध्यक्ष, समन्वय समिती

अथणी आमदारही नाराज

जिल्ह्यातील रमेश जारकीहोळी आधीपासूनच नाराज आहेत. आता त्यात अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांचीही भर पडल्याचे समजते. प्रथमच आमदार बनलेले कुमठळ्ळी भाजपच्या संपर्कात असून, त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे मनसुबे रचले आहेत. नाराज आमदार असे ः  रमेश जारकीहोळी (गोकाक), महेश कुमठळ्ळी (अथणी), शिवराम हेब्बार (यल्लापूर), डॉ. उमेश जाधव (चिंचोळी), डॉ. सुधाकर (चिक्कबळ्ळापूर), प्रकाशगौडा पाटील (मस्की), बसनगौडा दद्दल (रायचूर ग्रामीण), आनंदसिंग (विजयनगर), बी. नागेंद्र (बळ्ळारी ग्रामीण), बी. सी. पाटील (हिरेेकेरूर), सुब्बारेड्डी (बागेपल्ली).