Wed, Aug 12, 2020 20:00होमपेज › Belgaon › तिहेरी हत्याकांड : प्रवीण भटला जन्मठेप

तिहेरी हत्याकांड : प्रवीण भटला जन्मठेप

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:51AMबेळगाव : प्रतिनिधी

कुवेंपूनगरमधील विवाहिता आणि तिच्या दोन मुलांची हत्या करणार्‍या प्रवीण भटला न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 15 ऑगस्ट 2015 च्या मध्यरात्री प्रवीणने रिना मालगत्ती (वय 37) हिचा गळा चिरून तर रिनाचा मुलगा आदित्य (12) व मुलगी साहित्या (5) यांचा बादलीत बुडवून निर्घृणपणे खून केला होता. या हत्याकांडाने बेळगावसह पूर्ण जिल्हा हादरला होता.

हत्याकांडाबद्दल प्रवीण भटला दोषी ठरवताना  येथील द्वितीय अतिरिक्‍त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एच. अन्‍नण्णावर यांनी जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. खटल्याच्या निकालाकडे बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांप्रमाणेच सर्व वकील वर्गाचे लक्ष वेधले होते.
शहारे आणणारी घटना
अंगावर शहारे आणणार्‍या या हत्याकांडाने पालकवर्गही हादरून गेला होता. कारण प्रवीण त्यावेळी बी. कॉम.च्या तिसर्‍या वर्षात शिकत होता. कॉलेजला असतानाच त्याने हे कृत्य केल्याने स्वतः त्याचे वडील सुब्रमण्याम भट यांनीही आपल्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले होते. 

भट कुटुंब आणि मालगत्तींचे घर शेजारी-शेजारी आहे. प्रवीण भट व रिना मालगत्ती यांच्यामध्ये एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. 14 ऑगस्ट रोजी रिनाचे पती राकेश मालगत्ती आपल्या भावासमवेत गोव्याला गेले होते. 15 ऑगस्टच्या रात्री रिनाने प्रवीणला आपल्या घरी बोलावून घेतले होते. मध्यरात्री 1 पर्यंत प्रवीण त्यांच्याच घरी होता. त्यानंतर टेरेसवरून रबरी पाईपच्या मदतीने खाली उतरून प्रवीणणे घर गाठले होते. त्याच रात्री पहाटे 3 च्या सुमारास रिनाने पुन्हा बोलावून घेतले. त्यावेळी प्रवीणने यापुढे अनैतिक संबंध ठेवू शकत नाही, असे सांगितले होते. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. 

त्यानंतर प्रवीणने रिनाला संपविण्याचाच निर्णय घेतला व तिच्यावर त्याने जांबियाने वार केले. रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या रिनाने जोरदार किंकाळी मारली. किंकाळी ऐकून रिनाची मुलगी साहित्या जागी झाली व तिने हा प्रकार पाहिला. त्यानंतर तिने आपला लहान भाऊ आदित्यला उठविले.  

साहित्या व आदित्यने जांबिया हातात घेतलेल्या प्रवीणला पाहिल्यामुळे आपले काही धड नाही, ही मुले आपले बिंग फोडणार या भीतीने  प्रवीणने त्या दोन्ही मुलांकडे आपला मोर्चा वळविला व प्लास्टिक दोरीने दोघांच्याही माना आवळून  नंतर त्यांना बाथरूममधील बादलीत बुडवून ठार मारले. हे करताना प्रवीणने त्यांचे पाय बांधले होते.

तिघांचाही मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रवीण त्या घरातून पाईपच्या सहाय्याने खाली आला व त्याने आपले घर गाठले. 
प्रवीणही बघ्यांमध्ये
रविवारी सकाळी म्हणजे 16 ऑगस्ट रोजी हा तिहेरी खुनाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर मालगत्तींच्या घरासमोर प्रचंड गर्दी झाली होती.  त्या गर्दीत प्रवीणही होता. तिहेरी खुनामुळे तोही हळहळ व्यक्‍त करत होता. ही  घटना खूपच भयानक असल्याचेही  मत त्याने व्यक्‍त केले होते. मात्र तो फक्‍त या हत्याकांडाशी आपला कोणता संबंध असल्याचे पोलिसांना समजले आहे का, याचीच चाचपणी तो करत होता, 

पोलिसांना रात्रीपयर्ंत खुन्याचा थांगपत्ता लागला नाही. याची खात्री करून घेऊनच प्रवीण आपल्या घरी निवांत होता. परंतु रात्री 11.30 वा. च्या दरम्यान एपीएमसी पोलिसांनी प्रवीण भटच्या घरचे दरवाजे ठोठावले त्यावेळी पोलिसांना पाहून गांगरलेल्या प्रवीणला त्यांनी आपल्या ताब्यात घेतले.  त्याची खोलवर चौकशी केल्यानंतर अनैतिक प्रकारणावरून आपण रिना व तिच्या दोन्ही मुलांचाही निर्घृणपणे खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. 
मोबाईलवरून तपास खून होण्यापूवी रात्री 3 वा. च्या दरम्यान रिनाने आपल्या मोबाईलवरून प्रवीणला कॉल केला होता.

त्या कॉलआधारेच खून प्रकरणाचा छडा लागला. तत्कालीन पोलिस आयुक्त एस.  रवि यांनी या तिहेरी हत्याकांडाचा शोध लावण्याकरिता चार पोलिस पथकांची नियुक्ती केली होती. केवळ 12 तासाच्या कालावधीत पोलिसांनी प्रवीणच्या मुसक्या आवळल्या होत्या.

पोलिसांनी प्रवीणला 16 ऑगस्ट 2016 रोजी अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चतुर्थ न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली. तेव्हापासून आतापर्यंत प्रवीण भट हिंडलगा कारागृहातच आहे. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला नव्हता. जामीनासाठी प्रवीणने उच्च न्यायालयातही अर्ज केला होता.  प्रवीण  त्यावेळी बी. कॉम करत असताना सीए  परीक्षाही देत होता.
 

Tags :Triple murder:, Praveen Bhatla's ,life imprisonment ,belgaon news