Fri, Sep 18, 2020 20:06होमपेज › Belgaon › बेडकीहाळमध्ये तीन घरफोड्या

बेडकीहाळमध्ये तीन घरफोड्या

Published On: Dec 03 2018 1:38AM | Last Updated: Dec 02 2018 11:55PMबेडकीहाळ : वार्ताहर

सिद्धार्थनगर परिसरातील तीन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी रात्री घडलेल्या या घरफोड्या रविवारी सकाळी उघडकीस आल्या.

बाळगोंडा धनपाल नारे यांच्या घराच्या खोलीचे चोरट्यांनी कुलूप तोडून तिजोरी फोडून साहित्य विस्कटून टाकले. तसेच अडीच तोळ्याचा नेकलेस, चार तोळ्याचे गंठण, लहान मुलांचे सहा ग्रॅम सोन्याची अंगठी व चार नग चांदीचे हातातील कडे, तीन नग चांदीचे कडदोरे व चार हजार रुपये  रोखड घेऊन लंपास केल्याची माहिती सूरज नारे यांनी दिली आहे.
सरकारी वसतीगृह शेजारी असलेले भीमसेन इंदुराव सूर्यवंशी हे सध्या महाराष्ट्रातील देवगड येथे वास्तव्यास आहेत. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडली. हाती काही न लागल्याने 5 हजार किमतीचे कूलर लंपास केले. लगतच असलेल्या अमोल विश्वास माळगे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला. पण घरातील मंडळी जागी झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.

रविवारी सायंकाळी 4.30 वाजता बेळगावहून श्‍वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.  पण श्‍वान फार दूर जाऊ शकले नाही. घटनास्थळी सदलगा पोलिस उपनिरीक्षक संगमेश दिडगीनाळ, साहायक पोलिस आर. एस. पुजारी, एस. एच. इरगार, पी. एल. कांबळे, एस. ए. जमकोळी यांनी भेट दिली.