कर्नाटकात कोरोनाचा तिसरा टप्पा?

Last Updated: Mar 27 2020 1:16AM
Responsive image


बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात गुरुवारी आणखी चार कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 55 झाली आहे. बुधवारी गौरीबिदनूर (जि. चिक्‍कबळ्ळापूर) येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळेच झाल्याचे निदान करण्यात आले आहे. म्हैसुरातील तरुणाने कोणताही विदेश दौरा केला नसला, तरी त्याला कोरोनाची बाधा झाल्याने या रोगाचा हा तिसरा टप्पा आहे का, अशी भीती निर्माण झाली आहे.

बुधवारी एकाच दिवसात दहा कोरोनाबाधित आढळले होते. गुरुवारी आणखी 4 रुग्ण वाढले.  त्यात म्हैसूरमधील 35 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे दिसून आले. हा तरुण एका औषध कंपनीच्या उत्पादन विभागात काम करतो. त्याने कोणताही विदेश दौरा केला नव्हता की विदेश दौरा करून आलेल्यांच्या संपर्कात आला नव्हता, तरीही त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याच्यावर म्हैसुरातील रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या सातणांना घरातच स्थानबद्ध करण्यात आले आहे.

त्याशिवाय आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील एका 64 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाली. ते 1 मार्च रोजी फ्रान्सहून भारतात परतले होते. हिमाचल प्रदेश, पुट्टपर्थीचा प्रवास संपवून ते 21 मार्च रोजी बंगळूरला आले. आजारी पडल्याने त्यांना बंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल केले आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

कर्नाटकात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शिवाय संशयित रुग्णही वाढत आहेत. यामुळे राज्य सरकार तणावाखाली असून पुढील 19 दिवसांत अधिकाधिक खबरदारी घेण्याविषयी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यात लॉकडाऊनची  घोषणा केली आहे. 

कोणत्याही कारणास्तव गर्दी होऊ देऊ नये, अशी सूचना सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे. त्यानुसार सर्वत्र जमावबंदी केली आहे. ठिकठिकाणी पोलिस तैनात करून अनावश्यक फिरणार्‍यांवर नियंत्रण ठेवले जात आहे. राज्यांच्या सीमांवर नाकाबंदी केली आहे. असे असतानाही लोक रस्त्यावर येत आहेत. केवळ आवश्यक सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण, त्याचे उल्‍लंघन होत असल्याने आगामी काळात आणखी कठोर उपाययोजना करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

21 दिवस सर्वत्र लॉकडाऊन आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अजून 19 दिवस महत्त्वाचे आहेत. नागरिक रस्त्यावर आले तर लॉकडाऊनचा काहीच उपयोग होणार नाही. दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोक रस्त्यावर येतात. त्याचा पुरवठा करणे सरकारचे कर्तव्य आहे. याचे नियोजन कसे करता येईल, यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

वृद्धेचा मृत्यू कोरोनामुळेच

मक्‍का येथून बंगळूरला परतलेल्या 70 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. 24 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक चाचणीत त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सरकारकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर वृद्धेला हृदयविकार, मधुमेह आदी विकार होते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.