Sat, Feb 29, 2020 18:47होमपेज › Belgaon › रात्रीत सहा दुकाने फोडली

रात्रीत सहा दुकाने फोडली

Published On: Oct 07 2019 1:59AM | Last Updated: Oct 07 2019 1:59AM

बेळगाव : तोडण्यात आलेले कुलूप. दुसर्‍या छायाचित्रात फोडण्यात आलेले दुकान.बेळगाव : प्रतिनिधी
शहरातील मध्यवर्ती भागात असणार्‍या कांदा मार्केट व रविवार पेठ या मुख्य बाजारपेठेतील सहा दुकाने शनिवारच्या रात्री फोडण्यात आली. 

रविवार पेठ येथील साखर, तेल व्यापारी बी. बी. पट्टणशेट्टी, मीठ व्यापारी जी. व्ही. हणमशेट या दुकानांसह इतर दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोरट्यांनी पट्टणशेट्टी यांच्या दुकानाच्या गॅलरीतील दरवाजा फोडून आत प्रवेश केला आहे. तर काही दुकानांचे कुलूप एक्साब्लेडने कापून आत प्रवेश केला आहे. चोरट्यांच्या हाताला कोणत्याच महागड्या वस्तू अथवा पैसा लागलेला नसल्याचे व्यापार्‍यांतून सांगण्यात येत आहे. दुकानांमध्ये गल्ल्यात ठेवण्यात आलेली चांदीची नाणी व इतर काही किरकोळ चिल्लर गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कांदा मार्केट येथील दोन दुकानांमध्ये चोरीची घटना घडली आहे.

चोरट्यांनी दुकानांमध्ये आत प्रवेश करून कपाटांमधील चीजवस्तू, रक्‍कम चोरण्याचा प्रयत्न केला.  तसेच  अनेक वस्तू इतरत्र फेकून दिल्या आहेत. हा प्रकार शनिवारी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान घडला असल्याचा अंदाज आहे. पहाटे 5 च्या दरम्यान बाजार साहित्य घेऊन आलेल्या वाहनचालकांना दुकानांचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती मालकांना कळवली. 

रविवार पेठ परिसरात यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांचा पुरावा देऊनही पोलिसांनी तपासासाठी तसदी घेतली नसल्याचा आरोप करण्यात येत आहेत. पोलिसांकडून चोरीच्या घटनांचा तपास घेण्यात गांभीर्य दाखवले जात नसल्याने तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.