Sat, Jul 04, 2020 20:12होमपेज › Belgaon › उमेदवार करणार स्ट्राँग रुमची ‘चौकीदारी’

उमेदवार करणार स्ट्राँग रुमची ‘चौकीदारी’

Published On: Apr 17 2019 2:04AM | Last Updated: Apr 16 2019 10:32PM
बेळगाव : प्रतिनिधी

मतदान ते मतमोजणी यात सुमारे  महिन्याचा कालावधी आहे. या काळात उमेवदवारांचे राजकीय भवितव्य निश्‍चित करणारी मतदानयंत्रे स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्याची सुरक्षा महत्त्वाची असल्याने काही अटीनुसार स्ट्राँग रुमची चौकीदारी करण्याची मुभा निवडणूक आयोगाने उमेदवारांना दिली आहे.

मतमोजणी कमी झाली किंवा उमेदवार पराजयाच्या दारात असल्यास पक्षातील कार्यकर्ते अनेक कारणे शोधू लागतात. व्हीव्ही पॅट यंत्र खराब आहे, स्ट्राँग रुममध्ये घोळ आहे, असे अनेक आरोपही केले जातात. यावर आयोगाने उपाययोजना केली असून उमेदवारांना किंवा त्यांच्या एजंटांना स्ट्राँग रुमच्या चौकीदारीची परवानगी दिली आहे.

स्ट्राँग रुम वर लक्ष ठेवू इच्छिणार्‍या उमेदवार किंवा त्यांच्या एजंटांनी आपली नावे निवडणूक अधिकार्‍यांना पत्राद्वारे देणे गरजेचे आहे. मतदानाच्या दिवसापासून ते मतमोजणी होईपर्यंत स्ट्राँग रुमच्या आवारात आयोग दुसर्‍या खोलीची व्यवस्था करून देणार आहे. स्ट्राँग रुमच्या समोरच्या भागात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याने खोलीत बसूनच स्ट्राँग रुममधील हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.

निवडणूक अधिकार्‍यांनी ही सुविधा खूप आधीपासूनच उपलब्ध करून दिली आहे. पण, याबाबत बरेचजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आजवर याचा वापर कुणीच केला नसल्याचे समजते.

स्ट्राँगरुमवर लक्ष ठेवणार्‍या उमेदवारांना खोली व मूलभूत गरजा वगळता जेवण, नाश्ता, चहा यापैकी काहीच दिले जाणार नाही. परवानगी असणार्‍या व्यक्‍तीच खोलीत राहू शकतात.

महिनाभर राहणे त्रासदायक

निवडणूक आयोग स्ट्राँग रुमशेजारी खोली देईल खरे. पण, तिथे एक महिना राहणे खरेच त्रासदायक आहे, असे उमेदवार किंवा त्यांच्या एजंटांना वाटत आहे. स्ट्राँग रुममध्ये मतदान यंत्र जोडून ते सील करताना उमेदवार किंवा त्यांच्या एजंटांना बोलावले जाते. पण, कुणीच फिरकत नाही. अशा स्थितीत तेथे एक महिना राहणे त्रासदायक आहे.

स्ट्राँग रुमवर उमेदवारांकडून लक्ष ठेवता येते. याचा जास्तीतजास्त प्रचार करण्याची सूचना  निवडणूक निरीक्षकांनी दिली आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होऊ शकेल. -के. ए. दयानंद, जिल्हा निवडणूक अधिकारी, शिमोगा