Fri, Feb 28, 2020 23:53होमपेज › Belgaon › जिल्ह्याला मंत्रिपदे टाळण्यासाठी पुन्हा जारकीहोळींचाच वापर

जिल्ह्याला मंत्रिपदे टाळण्यासाठी पुन्हा जारकीहोळींचाच वापर

Last Updated: Jan 12 2020 10:56PM
बेळगाव : प्रतिनिधी

ज्या रमेश जारकीहोळींचा वापर करून भाजपने सत्तेचा सोपान पार केला, त्यांचाच वापर करून जिल्ह्याला मंत्रिपदे टाळण्यासाठी भाजपने व्यूहरचना आखली आहे. अथणीचे आ. महेश कुमठळ्ळी आणि कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांची समजूत तुम्हीच काढा, असा अप्रत्यक्ष सल्ला हायकमांडने रमेश जारकीहोळींना दिल्याचे समजते. 

राज्यात  भाजपची  सत्ता  येण्यात महत्वाचा वाटा रमेश जारकीहोळी यांचा आहे, हे उघड  गुपीत आहे. अथणीचे आ. महेश कुमठळ्ळी  हे आधीपासून त्यांच्यासोबत होते. परंतु, अपात्रेचा ठपका बसल्यानंतर श्रीमंत पाटील हे देखील भाजपच्या गोटात सामील झाले. येडियुराप्पांनी ज्या-ज्या ठिकाणी सभा घेतल्या, तेथे भाजपवासी झालेल्या सर्व बंडखोर आमदारांना मंत्रिपदे देण्यात येतील, असे जाहीररित्या सांगितले होते. यामुळे जे अकरा बंडखोर निवडून आले त्या सर्वांना मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती. परंतु, हायकमांडच्या नावाखाली मुख्यमंत्री तसेच राज्यातील काही वरिष्ठ नेते आता निवडून आलेल्या या आमदारांना मंत्रिपद देण्यास टाळाटाळ करीत आहेत. 

जारकीहोळींचा वापर बंडखोरी, त्यानंतर भाजपमध्ये सहभागी होणे आणि भाजपची एकहाती सत्ता आणणे यामध्ये रमेश जारकीहोळी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे आमची सत्ता आली असून, त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही, असे मुख्यमंत्री येडियुराप्पांनी वारंवार सांगितले आहे. परंतु, आता त्यांच्याच छायेखाली आमदार बनलेल्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याचा डाव भाजप आखत आहे. जारकीहोळी यांचा वापर करून  भाजप सत्तेपर्यंत पोहोचले आहे. आता तर पुन्हा त्यांचाच वापर करून जिल्ह्यातील दोघांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याचा डाव भाजप हायकमांडकडून आखला जात आहे. पोटनिवडणुकीत निवडून आलेले दोन्ही आमदार तुमचे ऐकतात, त्यामुळे तुम्ही त्या दोघांना समजावून सांगा, अशी गळ त्यांना घातल्याचे समजते. यासाठी त्यांना मात्र वजनदार खाते देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. परंतु, जे आपल्यासोबत राहिले, त्यांना वगळून फक्‍त आपणच पुढे जाण्यास रमेश जारकीहोळी तयार नाहीत. त्यामुळे ते   पुन्हा बंडाचे निशाण फडकावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजप हायकमांड त्यांचे मन वळविण्यात यशस्वी होते की, रमेश आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.  पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील दोन आमदार  निवडून आल्यानंतर जिल्ह्याला पाच ते सहा मंत्रिपदे मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु, एकाच जिल्ह्याला इतकी मंत्रिपदे दिल्यानंतर इतर जिल्ह्यातील नेत्यांना काय सांगायचे? असा प्रश्‍न आता हायकमांड उपस्थित करत आहे.    यासाठी पुन्हा जारकीहोळींचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दोन्ही आमदार आक्रमक 

कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील व त्यांचे समर्थक सध्या आक्रमक पावित्र्यात आहेत. जाहीररित्या कबुली दिल्यानंतर मंत्रिपद हवेच, अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. बीएस्सी अ‍ॅग्री असलेल्या श्रीमंत पाटील यांना कृषीमंत्री पद द्यावे, अशीही कार्यकर्त्यांची भावना आहे. अथणीचे आ. महेश कुमठळ्ळी हे जसे रमेश जारकीहोळी सांगतील, तशी भूमिका घेत आले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळणार, असेच वाटते. त्यामुळे मंत्रिपदासाठी ते देखील इच्छुक आहेत.

उपमुख्यमंत्री सवदींची भूमिका सावध 

उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी निवडणुकीपूर्वी या दोघांना हाताला धरून विधानसभेत घेऊन जाईन, असे शपथेवर सांगितले होते. त्यांनी ती भूमिका योग्यरित्या पार पाडली आहे. परंतु, या दोघांना मंत्रिपदाविषयी ते फारसे कुठे बोलले नव्हते. जिल्ह्याला दोन मंत्री मिळाले तर ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने भूषणावह आहे. परंतु, सवदींच्या  भावी राजकारणाच्या दृष्टीने अहितकारक आहे. जर हे दोघेही मंत्री झाले, तर आपली किंमत कमी होणार, हे चाणाक्ष सवदींनी ओळखलेले आहे. त्यामुळे त्यांनी फक्‍त भाजपची सत्ता आणण्यासाठी यांना आमदार करण्यासाठी आपले प्रयत्न होते. आता त्यांना मंत्रिपदे द्यायची की नाही, हा निर्णय हायकमांड घेईल, अशी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते.