Mon, Jan 18, 2021 10:33होमपेज › Belgaon › मराठी भाषा दिन विशेष : जागतिकीकरणाच्या रेट्यात बोलीभाषा धोक्यात

मराठी भाषा दिन विशेष : जागतिकीकरणाच्या रेट्यात बोलीभाषा धोक्यात

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 26 2018 10:20PMबेळगाव : सुनील आपटे

भारतात आजघडीला सुमारे 1600 भाषा लिखित अथवा मौखिक रूपात प्रचलित आहेत. या भाषांतील साहित्याची समृद्ध परंपरा आहे. लोकजीवनात प्राण फुंकण्याचे काम या भाषा करीत आल्या आहेत. भाषेमुळेच मनुष्यजीवन समृद्ध होत आले आहे.

आपले संवाददेखील भाषांतूनच होत असतात. परंतु जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तीमुळे स्थानिक भाषांची उपेक्षा होत असून त्यांच्या संवर्धनाकडे कानाडोळा होत आहे. शहरी, अर्ध शहरी भागात आपल्या भाषांना उतरती कळा दिसून येते. देशातील सुमारे 200 भाषा संकटात आहेत. 

शिक्षणाचा स्तर वाढेल तसा विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी आदी भाषांकडे झुकलेला दिसतो. या भाषा त्यांना अधिक श्रेयस्कर आणि अनुकरणीय वाटत आहेत. स्वदेशी भाषेचा अभिमान बाळगणे आणि व्यवहारात वापर करणे आजच्या विद्यार्थ्यांना कमीपणाचे वाटत आहे. ‘भाषेविना समुदाय म्हणजे आत्मा नसलेली व्यक्ती’ असे आफ्रिकन साहित्यिक एन्गुगी थियाँग यांनी म्हटले आहे. मराठीच्या बाबतही थोड्या फरकाने अशी स्थिती येऊ शकते. मातृभाषेची उपेक्षा व्यक्तिगत, सामाजिक आणि राष्ट्र यांच्या कोणाच्याच हिताची ठरत नाही. 

गेल्या 5 दशकात 220 भाषा भारतातून नष्ट झाल्या आहेत. 780 भाषा भारतात बोलल्या जातात. अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त भाषा आहेत. ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ यांनी केलेल्या एका सर्वेक्षणात देशामध्ये 780 बोली भाषा आहेत तर 66 लिपी आहेत. अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक 90 भाषा अस्तित्वात आहेत. देशामध्ये 122 भाषा अशा आहेत ज्या 10 हजाराहून अधिक लोक बोलतात. यामध्ये 22 अनुसूचित भाषांचा समावेश आहे. उपरोक्त सर्व्हेक्षणात असेही आढळून आले आहे की कमी वापर होणार्‍या भाषाही बोलल्या जातात. 

या भाषा वनवासी आणि पूर्वोत्तर भागात आहेत. झारखंडच्या वनवासी भागात 16 हून अधिक भाषा आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये सर्वाधिक 9 लिपी चिन्हित झाल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये 90, आसामध्ये 55, गुजरातमध्ये 48, पश्‍चिम बंगालमध्ये 38 तर महाराष्ट्रात 39 भाषा बोलल्या जातात. 

मराठी टिकवा...संस्कृती वाचवा...

सीमाभागातील मराठी भाषकांनी मराठीबरोबरच संस्कृती जतनाचे काम निष्ठेने सुरू ठेवले आहे. परंतु आणखी 25 वर्षांनंतर या भागातील मराठीचे अस्तित्व टिकेल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. मराठी भाषिक पालकांनी आपल्या मुलांना मराठी संस्कार दिले तर उपरोक्त भीती अनाठायी ठरेल. यासाठी मराठी जणांनी आतापासूनच मराठीच्या संवर्धनासाठी कटिबध्द होऊन मराठी वाचन चळवळ घराघरांत पोहोचवायला हवी. मराठी टिकली तर मराठी संस्कृती टिकेल हे लक्षात घ्यायला हवे. कारण एक भाषा नामशेष झाली तर तिची संस्कृतीच लोप पावत असते.