Thu, Jan 30, 2020 03:20होमपेज › Belgaon › भिंतींवर ‘फ्री काश्मीर’चा मजकूर

भिंतींवर ‘फ्री काश्मीर’चा मजकूर

Last Updated: Jan 15 2020 1:43AM
बंगळूर : प्रतिनिधी

म्हैसूर विद्यापीठानंतर आता सिलिकॉन सिटी बंगळूरमध्ये ‘फ्री काश्मीर’ची वादग्रस्त हाक देण्यात आली आहे. येथील काही ठिकाणच्या दुकानांवर, भिंतींवर फ्री काश्मीर असा मजकूर लिहिण्यात आल्याचे मंगळवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आले.

चर्च स्ट्रीट रोडवरील भिंती, दुकानांच्या शटरवर फ्री काश्मीर असा मजकूर लिहिण्यात आला होता. शिवाय नो सीएए, नो एनआरसी, नो एनपीए, भाजप इज कॅन्सर, मोदी फॅसिस्ट असा  मजकूर लिहिण्यात आल्याचे दिसून आले. याबाबतचे वृत्त शहरासह सोशल मीडियावर फिरत होते. संपूर्ण राज्यासह राष्ट्रीय पातळीवर दिवसभर याची चर्चा सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध करून अनेक प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला होता. संपूर्ण रस्त्यावरील भिंती आणि दुकानांचे शटर अशा मजकुराने भरले होते. यामध्ये ‘फ्री काश्मीर’ असे लिहिण्यात आल्याने आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परिसरात असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये मजकूर लिहिणार्‍यांची छबी कैद झाली आहे. पहाटे तीनच्या सुमारास दोघेजण स्कूटरवरुन आले. त्यांच्या हातात स्प्रे होते. काही मिनिटांतच त्यांनी मजकूर लिहून तेथून पलायन केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कब्बन पार्क पोलिसांनी घटनास्थळी असणार्‍या सीसी टीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. अज्ञातांविरुद्ध स्वयंप्रेरित तक्रार नोंदवून त्यांनी तपास सुरु केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लिहिलेला मजकूर पुसण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. तो मजकूर रंगाने खोडण्यात आला. सकाळी काही हिंदुत्ववादी संघटनांनी घटनास्थळी येऊन घोषणाबाजी केली. वादग्रस्त मजकुरावर रंग लावून तो खोडण्यात आला.