Tue, Sep 22, 2020 00:58होमपेज › Belgaon › काँग्रेसची चौकशीविरुद्धची भूमिका देशाला मारक : रेल्वे राज्यमंत्री अंगडी

काँग्रेसची चौकशीविरुद्धची भूमिका देशाला मारक : रेल्वे राज्यमंत्री अंगडी

Published On: Sep 07 2019 2:01AM | Last Updated: Sep 06 2019 11:53PM
बेळगाव : प्रतिनिधी

सक्‍तवसुली संचलनालयासारखी (ईडी) चौकशी एजन्सी कायद्याच्या चौकटीत काम करत असताना काँग्रेसकडून करण्यात येणारे  सार्वजनिक  मालमत्तेचे नुकसान हे देशाला आणि लोकशाहीला मारक आहे, असे मत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी व्यक्‍त केले. 

येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आ. अनिल बेनके, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र हरकुणी, शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. एम. बी. जिरली, बसवराज होट्टी आदी उपस्थित होते.

अंगडी म्हणाले, ईडीने चौकशी करून दोषी आढळल्यानेच माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंमबरम, कर्नाटचे  माजी  मंत्री डी. के. शिवकुमार या काँग्रेस नेत्यांना अटक केली आहे. यामुळे नैराश्य आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर तीव्र आंदोलन हाती घेऊन सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. समाजामध्ये भितीचे वातावरण तयार करण्यात आले आहे. काँग्रेसची ही भूमिका म्हणजे इस्ट इंडिया कंपनीची परंपराच पुढे चालवण्याचा प्रकार आहे.  या चौकशी संस्थांना घटनेनुसार अधिकार देण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये भाजपाचे सरकार कधी हस्तक्षेप करत नाही.  असे असताना भाजपाची बदनामी सुरू करण्यात येत आहे.

काँग्रेस नेत्यांनी चौकशीला सामोरे जाऊन चौकशी अधिकार्‍यांना सहकार्य करावे. ते निर्दोष असतील तर नक्‍की बाहेर पडतील. ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा होणारच. तपास यंत्रणावर दबाव आणून बेकायदा कृत्ये करण्यात येत असल्याचा आरोप मंत्री अंगडी यांनी केला. वाजपेयी सरकार अस्तित्वात असताना माझ्या मालमत्तेवरही चौकशी समितीकडून धाडी पडल्या होत्या. यावेळी मी चौकशीला सामोरे गेलो. तपास अधिकार्‍यांना सहकार्य केले. याचे अवडंबर कधी माजवले नाही. काँग्रेसनेही चौकशीला सामोरे जावे, असेही ते म्हणाले. 370 वे 35 (एक) कलम रद्द करुन नरेंद्र  मोदी सरकारने अखंड भारत निर्माण करण्याकडे पाऊल उचलले आहे. काँग्रेसला हे गेल्या 70 वर्षात जमले नव्हते, अशी टीकाही त्यांनी केली. 

अतिवृष्टीमुळे दक्षता घ्यावी

सध्या जिल्ह्यात अतिवृष्टी सुरु असून, महाराष्ट्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नद्यांना पुन्हा पूर येत आहे. यामुळे जनतेने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांनी केले. दूधसागर येथे रेल्वेला थांबा देऊन पर्यटनला चालना देण्यात आली आहे. याचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.