Sun, May 31, 2020 18:36होमपेज › Belgaon › ट्रॅक्टरचे मागचे चाक अपघाताला कारण

ट्रॅक्टरचे मागचे चाक अपघाताला कारण

Last Updated: Nov 08 2019 11:21PM
बेळगाव : प्रतिनिधी

मिरज-पंढरपूर राज्य महामार्गाचे सध्या वेगाने सुरू असलेले काम, सिमेंटकरणाचा रस्ता यामुळे वाहनांचा वेग भरधाव असतो. परंतु, पाच वारकर्‍यांचा जीव घेणार्‍या या अपघाताला ट्रॅक्टरचे पाठिमागील मोठे चाक कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे. 

पहाटेची वेळ असल्याने चालकाच्या डोळ्यांवर झोपेची झापड असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंढरपूरला निघालेली बेळगाव तालुक्यातील एकूण चार वाहने होती. यापैकी एक वाहन अपघातग्रस्त बोलेरोच्या पुढे अवघे अर्धा-एक किलोमीटर होते, तर इतर वाहने थोडीशी पाठिमागे होती. ज्या बोलेरोला अपघात घडला, त्याच्या समोरून विटा भरलेले ट्रॅक्टर येत होता. जेव्हा ट्रॅक्टर जवळ आला, तेव्हा भरधाव असलेल्या बोलेरो चालकाला बहुदा ट्रॅक्टरपासून उजव्या  किती अंतर आहे, याचा अंदाज आला नाही. ट्रॅक्टरच्या समोरील निमूळत्या भागाच्या अंदाजाने तो पुढे गेला. परंतु, किमान अर्धा ते एक फूट बाहेर असलेल्या ट्रॅक्टरच्या पाठिमागील चाकाचा त्याला अंदाज आला नाही. या चाकालाच बोलेरो धडकल्याने अपघात झाला. 

घटनास्थळी भयावह स्थिती
घटनास्थळाचे चित्र अंगावर शहारे आणणारे होते. आधी ट्रॅक्टरच्या चाकाला आणि नंतर विटा भरलेल्या ट्रॉलीला धडकलेले बोलेरो वाहन पुन्हा विरूद्ध दिशेला तोंड करून थांबले होते तर, ट्रॅक्टर देखील 90 अंशाच्या कोनात थांबलेला दिसून आला. बोलेरोच्या समोरील भागाचा इतका दबला गेला होता की ती बोलेरो आहे, हेच ओळखून येत नव्हते. 

सर्वांच्या डोक्याला दुखापत 
अपघातात ज्यांचा मृत्यू झाला व जे जखमी आहेत, त्या सर्वांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पहाटेची वेळी असल्याने सर्वजण झोपेत होते. अंग सैल सोडून निवांतपणे पहुडलेले असताना अचानक जोराचा धक्का बसल्याने अनेकजण वाहनातील लोखंडावर तसेच विटा भरलेल्या ट्रॅक्टरच्या लोखंडी पट्ट्यांवर आदळले. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेल्यांचा मृत्यू झाला. 

चालक दहा मिनिटे जिवंत 
अपघातानंतर पाठीमागे काही मिनिटांवर असलेले अन्य वाहनांतील वारकरीही अपघातस्थळी दाखल झाले. केए पासिंगचे वाहन व आपल्याच भागातील वाहनाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर ते तातडीने थांबले. यावेळी चालक बोलेरोमधून उडून ट्रॅक्टरजवळ जाऊन पडला होता. त्याच्याकडे तातडीने धाव घेतली तेव्हा तो जिवंत होता. त्याला पाणी पाजले व दहा मिनिटे उठवून बसवले. परंतु, त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे पाठिमागील वाहनात असलेल्या एका वारकर्‍याने सांगितले. 

सर्व मृत 35 ते 45 वयोगटातील 
मृतांमध्ये सर्वजण 35 ते 45 वयोगाटातील आहेत. काहींची मुले अद्याप शाळेत शिकतात तर काहींची कॉलेजमध्ये. परंतु, त्यांच्या घरचा कर्ता व्यक्ती गेल्या या पाचही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत चालक यल्लाप्पा पाटील यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. कृष्णा कणबरकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व तीन मुली, महादेव कणबरकरांच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगा, बाळू ऊर्फ लक्ष्मण आंबेवाडीकर यांच्या मागे पत्नी दोन मुले तर अरुण मुतकेकर यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. 

काही जखमींवर मिरजेत उपचार 
मंडोळीतून निघालेल्या बोलेरोमध्ये एकूण 16 वारकरी होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून, चौघांना तातडीने सायंकाळी मिरज (जि. सांगली) येथे हलविण्यात आले. दोघा गंभीरवर सांगोला येथेच उपचार सुरू आहेत. 

दोन अपघातांमुळे संदिग्धता
पंढरपूर वारीला जाणार्‍या भुत्तेवाडी (ता. खानापूर) येथील टेम्पोला गुरूवारी रात्री अपघात झाला. यामध्ये आठजण जखमी झाले होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मंडोळी येथील वारकर्‍यांच्या वाहनाला अपघात होऊन पाच जण ठार, तर काही जखमी झाले. दोन्ही अपघात सांगोला परिसरात झाल्याने नेमके जखमी की मृत्यू अशी संदिग्धता दिवसभर ऐकायला मिळाली. परंतु, दोन्ही अपघात वेगवेगळे असल्याचा संदेश सोशल मिडियावर फिरल्यानंतर हे स्पष्ट झाले.

हृदय हेलावणारे वातावरण 
मंडोळी येथील चार कुटुंबे तसेच हंगरगा येथील एका मृताचे कुटुंब मंडोळी येथे येऊन थांबले होते. पाच मृतांचे कुटुंबीय, सर्व जखमींचे कुटुंब, नातेवाईक व ग्रामस्थ यामुळे गावात गर्दी झाली होती. गावातील दुःखी वातावरण हृदय हेलावून टाकणारे 
होते.