Thu, Sep 24, 2020 07:30होमपेज › Belgaon › शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होणार

शिक्षक, विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होणार

Last Updated: Nov 11 2019 10:59PM
खानापूर : प्रतिनिधी

शतकोत्तर अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या येथील चिरमुरकर गल्लीमधील सरकारी मराठी मुलांच्या आदर्श शाळेचा कायापालट करण्यात येत आहे. माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमींच्या सहकार्यातून स्मार्ट क्लासरुम, सीसीटीव्ही, शिक्षक व विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी आणि तंत्रस्नेही वातावरणाने सज्ज असलेली शाळा साकारण्यात येत असल्याने लवकरच डिजिटल शाळेचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.

नुकताच झालेल्या पालक मेळाव्यात शाळेच्या विकासकामांना सढळहस्ते मदत करण्याचा निर्धार पालक व माजी विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी प्रकाश चव्हाण होते. माजी नगरसेवक विवेक गिरी यांनी प्रास्ताविक करून शहरातील सर्वात जुन्या शाळेचा कायापालट करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शाळा डिजिटल आणि अत्याधुनिक ज्ञान साधनांनी परिपूर्ण करण्यात येणार आहे.

शाळेचे छत दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम पूर्णत्वाला आले आहे. त्याशिवाय बोलक्या पताक्या, एलईडी, संगणक, स्मार्ट बोर्ड, स्मार्ट ई-लर्निंगचे साहित्य आदी सुविधांची पूर्तता केली जात आहे. या शाळेमध्ये गुरव गल्ली, घाडी गल्ली, चिरमुरकर गल्ली, देसाई गल्ली, केंचापूर गल्ली, निंगापूर गल्लीसह शहर व ग्रामीण भागातील शेतकरी समाजाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. मात्र, अलीकडच्या काळात सरकारी शाळांकडे पालक व विद्यार्थ्यांनी पाठ फिरवण्याचा प्रकार वाढीस लागल्याने वेळीच उपाययोजना करण्यासाठी सरकारी शाळांचे पारंपरिक चित्र बदलण्याचा प्रयत्न माजी विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

याकामी शिक्षण विभागाकडूनही हकार्य केले जात आहे. शाळेच्या भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहे दिले आहे. ई-लर्निंग साहित्याचा वापर आणि शैक्षणिक साहित्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी धडपड शिक्षक मंचच्या शिक्षकांनी घेतली आहे. माजी विद्यार्थ्यांपैकी प्रकाश चव्हाण, प्रकाश देशपांडे, संजय कुबल, भाऊसाहेब जी. पाटील, अभिजित कालेकर, नारायण काटगाळकर, माजी मुख्याध्यापिका अरुंधती दळवी, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर, गुंडू तोपिकिट्टी, धाकलू गुरव कुटुंबीय, आर. बी. बांदिवडेकर, टी. बी. मोरे अलोक वागळे, आबासाहेब दळवी, नारायण जळगेकर आदींनी आर्थिक मदतीसह शैक्षणिक उपकरणे देण्याचे जाहीर केले.

शाळेत सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न दूर होणार आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे शालेय व्यवस्थापनात पारदर्शकता येणार आहे. शाळेचे छत व स्वयंपाक खोली दुरुस्ती, पाण्याची सोय, रंगरंगोटीसाठी आजपर्यंत तीन लाख. रु. खर्च करण्यात आले असून डिजिटल शाळेसाठी दहा लाख रु. खर्च अपेक्षित असल्याने दानशूरांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 "