Tue, Sep 22, 2020 01:32होमपेज › Belgaon › ...अन् पोलिसाचाच मोबाईल घेऊन पळाला भामटा

...अन् पोलिसाचाच मोबाईल घेऊन पळाला भामटा

Published On: Apr 08 2019 1:54AM | Last Updated: Apr 07 2019 11:41PM
बेळगाव : प्रतिनिधी  

अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिस कारवाई करताना पोलिसाच्या हातातील मोबाईल अनवधानाने पडला. यावेळी दुचाकीस्वार भामटा चक्क पोलिसाचा मोबाईल घेऊन पळाला. तो पुढे अन् पोलिस त्याच्या मागे असा प्रकार शनिवारी रात्री सातच्या सुमारास कोल्हापूर सर्कल मध्ये पाहायला मिळाला. सदर भामटा अट्टल गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना आल्याने त्यांनी त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

त्याचं झालं असं की, सायंकाळी सातच्या सुमारास केएलईकडून चन्नम्मा सर्कलकडे अंदाजे तिशीतला तरुण निघाला होता. कोल्हापूर सर्कलला आल्यानंतर सिग्नल पडलेला असतानाही त्याने आपली दुचाकी तशीच दामटली. यावेळी समोरून निघालेल्या दुचाकीला जोराची धडक बसली. येथे उपस्थित दोघे वाहतूक पोलिस अपघातस्थळी गेले व त्यांनी सदर तरुणाची कॉलर पकडली. तो तरुण अधिक दादागिरी करू लागल्याने पोलिसाने त्याच्या कानाखाली लगावली. झोंबाझोंबी सुरू असताना पोलिसाचा मोबाईल हातातून पडला. यावेळी सदर भामटा आपली दुचाकी तिथेच सोडून पोलिसाचा पडलेला मोबाईल घेऊन पळू लागला. पोलिसांनाही काहीच कळेना, तेही त्याच्या मागे धावले हा भामटा वाय जंक्शनपासून आतील गेलेल्या मार्गावरून थेट सदाशिवनगरमधील स्मशानभूमीत घुसला. पोलिसांनी तेथे बराच वेळ शोधाशोध केली. परंतु तो सापडत नव्हता. शेवटी तो येथील मोबाईल टॉयलेटमध्ये लपून बसल्याचे आढळून आले. मोबाईल नेल्यामुळे पळून थकल्याने चिडलेल्या त्या पोलिसाने त्याची आणखी यथेच्छ धुलाई केली. एकंदरीत या तरुणाच्या पेहरावावरून आणि त्याच्या वागण्यावरून तो अट्टल गुन्हेगार वाटत होता. दुचाकी चौकातच टाकून पोलिसाचा मोबाईल घेऊन पळून  जाणार्‍या या तरुणाने सदरची दुचाकी चोरी केलेली आहे का, असा प्रश्‍न पोलिसांना पडला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याला मार्केट पोलिसांच्या हवाली केले.