Fri, Feb 28, 2020 22:36होमपेज › Belgaon › तलावाच्या पिचिंगवरील पोल अज्ञाताने उखडले

तलावाच्या पिचिंगवरील पोल अज्ञाताने उखडले

Last Updated: Nov 11 2019 1:32AM
नपाणी : प्रतिनिधी

निपाणी शहरास पिण्याचा पाणीपुरवठा करणार्‍या जवाहरलाल तलावाच्या पूर्वेकडील बंधार्‍याच्या पिचिंगचे  काम नगरोत्थान योजनेतून पूर्ण झाले आहे. येथे उभारण्यात आलेले सिमेंटचे छोटे पोल अज्ञाताने उखडून  टाकले  आहेत. त्यामुळे जवाहर तलावाच्या सुरक्षिततेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे  उघड होत आहे.

शनिवारी भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी तलावाला भेट देऊन उखडलेल्या पोलची पाहणी केली. वास्तविक तलावाला गेट आहे. तलाव पाहण्यासाठी व पर्यटनासाठी वर्दळ वाढली आहे. या तलावाच्या सुरक्षिततेकडे पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. येथे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अज्ञाताने लाखो रुपये खर्च करून उभारलेले सिमेंटचे पोल उखडून टाकले आहेत. तलावाच्या  पूर्वेकडील  बाजूस असलेले गेट ही उघडे असते. त्यामुळे येथे कोणाकोणाचा वावर असतो याला प्रतिबंध करणारी यंत्रणा पालिकेने उभारलेली नाही. जवाहर तलावाचे शुद्धीकरण झालेले पाणी रिझर्व टँकला नेणार्‍या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. ही गळती काढण्याकडे किंवा नवीन पाईपलाईन घालण्याकडे पालिका प्रशासन केयुआयडीएफसी व जैन इरिगेशन कंपनीचे गेल्या सहा महिन्यांपासून दुर्लक्ष आहे. तलावाच्या पूर्वेकडील बाजूस गळतीचे  पाणी  वाहून  जात  आहे.

शहरास पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव ऑगस्ट महिन्यापासून ओसंडून वाहत आहे. प्रशासन मात्र निपाणी शहराला दोन दिवसाआड पाणी देत आहे. 24 तास पाणी योजना अद्याप सुरू केलेली नाही. या योजनेचे सुमारे 14 हजार नळ कनेक्शन शहर व उपनगरात देण्यात आलेले आहेत. नागरिकांना 24 तास पाण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, जलशुद्धीकरण केंद्राचे वाळू बदलाचे काम अद्याप झालेले नाही. ते झाल्यावरच 24 तास पाणी दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही कामे केव्हा होणार हे मात्र सांगितले जात नाही. गेल्या 20 नोव्हेंबर रोजी 24 तास पाणी योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर फक्त ट्रायल घेण्यात आली. प्रत्यक्षात 24 तास पाणी शहर व उपनगरला मिळालेले नाही. या योजनेवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. उन्हाळ्यात नागरिकांना 5 दिवसांतून पाणीपुरवठा झाला होता. आता तलाव ओसंडून वाहत असताना 24 तास पाणी का नाही? असा सवाल  विचारला जात आहे. तलावाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाव्यात, अशी मागणीही होत आहे.