Sat, Feb 29, 2020 19:12होमपेज › Belgaon › चिकोडीत तरुणाचा ठेचून खून

चिकोडीत तरुणाचा ठेचून खून

Published On: Jun 18 2019 2:03AM | Last Updated: Jun 18 2019 2:03AM
चिकोडी : प्रतिनिधी 

दगडाने ठेचून निर्घृणपणे तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी शहरातील उमराणी रस्त्यावरील वजन काट्यासमोर उघडकीस आली. ज्योतीगौडा महादेव पाटील (वय 40, रा. केरुर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

उमराणी रस्त्यावरील वजनकाट्यासमोर रस्त्याच्या बाजूला झुडपात सकाळी दगडाने ठेचलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळला. नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळविली. यानंतर घटनास्थळी चिकोडी एएसपी डॉ. मिथुनकुमार जी. के., पीएसआय एस. बी. पाटील यांनी पाहणी केली. मृतदेह केरुर येथील ज्योतीगौडा पाटीलचा असल्याचे स्पष्ट झाले. 

पोलिसांनी बेळगावहून श्‍वानपथक पाचारण केले, पण काही अंतरावर जाऊन कुत्रे घुटमळले. त्यामुळे हल्लेखोर वाहनाने पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्योतीगौडा हा तरुण ट्रॅक्टर ड्रायव्हर व शेतीचा व्यवसाय करीत असून वडील महादेव गावातील यात्रा कमिटीचे पंच आहेत. ज्योतीगौडा यांचा दहा वर्षांपूर्वी अश्‍विनी यांच्याशी विवाह झाला आहे. या दांपत्याला प्रितम नांवाचा एक मुलगा आहे.   पोलिसांनी पंचनामा करुन चिकोडी सरकारी इस्पितळात रात्री उशिरा उतरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

खुनाचा छडा लावण्यासाठी चिकोडी सीपीआय बसवराज मुकर्तीहाळ यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले आहे. दोन दिवसात आरोपींना जेरबंद करण्याचा विश्वास पोलिस अधिकार्‍याने व्यक्त केला.

ज्योतीगौडा  रविवारी  सायंकाळी 7.30 वा. केरुर येथील घरातून बाहेर पडला होता.  अर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणामुळे त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने नागरीक घाबरले. खून झाल्याची बातमी शहरात सर्वत्र वार्‍यासारखी पसरल्याने नागरीकांनी मोठी गर्दी झाली.