Tue, Jul 07, 2020 17:59होमपेज › Belgaon › ‘निपाणी’ला सर्वांगीण विकासाची आशा

‘निपाणी’ला सर्वांगीण विकासाची आशा

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:04PMनिपाणी : राजेश शेडगे

विधानसभेची निवडणूक पार पडल्यावर आता निपाणी तालुक्याला  सर्वांगीण विकासाचे वेध लागले आहेत. आ. शशिकला जोल्ले या सलग दुसर्‍यांदा निवडून आल्याने त्यांच्यासमोर तालुक्याच्या विकासाचे आव्हान असणार आहे. कर्नाटक-महाराष्ट्राला जोडणारे मोठे शहर आणि कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या निपाणीला तालुक्याचा दर्जा मिळाल्याने आता सर्वांगीण विकास तितकेच आवश्यक आहेत.

सर्वांच्या प्रयत्नांमुळेच 63 वर्षानंतर निपाणी तालुका अस्तित्वात आला. राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाटकातील शेवटचे मोठे शहर व तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराच्या औद्योगिक विकासाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. चिकोडी मोठा तालुका म्हणून या तालुक्याला मिळणारा विकासनिधी अधिकतर चिकोडी भागाकडेच वळविला गेला.मुंबई इलाख्यातील हे शहर सीमाप्रश्‍नाच्या जंजाळात अडकल्याने विकासात मागे पडले आहे. निपाणी तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी होत आहे.

मिनी विधानसौधची गरज

शहराला मोठ्या स्टेडियमची, पोहण्याच्या तलावाची आणि मिनी विधानसौध इमारतीची गरज आहे. शहरात  केवळ म्युनीसिपल हायस्कूल व समर्थ व्यायाम मंडळ शाळेचे मैदान खेळासाठी उपलब्ध आहे. शहराजवळ मिनी स्टेडियमची उभारणी करून सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शहरात केएलई संस्थेने पहिला स्विमिंग पूल उभारला आहे. खासगी तत्त्वावरील हा तलाव असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दर परवडत नाहीत.

शहरातील विविध शासकीय कार्यालये भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. सदर कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी मिनी विधानसौंध इमारतीची गरज आहे. त्यासाठी पालिकेने आंबा मार्केट समोरील जागा आरक्षितही केली आहे. शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण, स्वच्छ व सुंदर निपाणी साकारण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शहराच्या सवार्ंगीण विकासासाठी शासकीय अनुदानाची गरज आहे.

निपाणी तालुक्यातील गावे

निपाणी मतदारसंघात सुळगाव, कोगनोळी, हंचिनाळ, कुन्नूर, शिवापूरवाडी, गजबरवाडी,  मांगूर, बारवाड, कारदगा, ढोणेवाडी, कसनाळ, माणकापूर, बोरगाव, बोरगाववडी, चाँदशिरदवाड, बेडकीहाळ, भोज, भोजवाडी, बेनाडी, बोळेवाडी, आडी, जैनवाडी, सौंदलगा, कुर्ली, मत्तीवडे, हदनाळ, भाटनांगनूर, आप्पाचीवाडी, बुदिहाळ, यमगर्णी, भिवशी, सिदनाळ, हुन्नरगी, गळतगा, भिमापूरवाडी, ममदापूर, अकोळ, जत्राट, श्रीपेवाडी, नांगनूर, कोडणी, गायकवाडी, लखनापूर, पडलिहाळ, अमलझरी, शिरगुप्पी, पांगिरे बी, बुदलमूख, शेंडूर, गोंदुकूपी, यरनाळ,  गवाण  व  तवंदी गावे येतात.
निपाणी तालुक्यातील गावांना पिण्याचे व शेतीचे पाणी उपलब्ध  झाल्यास तालुका सुजलाम् सुफलाम् होणार आहे.

म. गांधी हॉस्पिटलमध्ये सोयींची गरज

निपाणी विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल म्हणजे म. गांधी हॉस्पिटल होय. येथे चाईल्ड अ‍ॅड मदर केअर सेंटरची उभारणी होत आहे. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटर, गर्भवती महिलांसाठी स्कॅनिंगची सोय, किडनी पेशंटसाठी डायलेसीसची सोय होणे गरजेचे आहे. येथील दंत विभाग सक्षम करून विविध सोयी सुविधा देण्याची गरज आहे.

रोजगार उपलब्ध व्हावा

निपाणीजवळ मोठ्याप्रमाणात जमीन उपलब्ध आहे. येथे एसईझेड तत्त्वावर उद्योगांची उभारणी करून निपाणी तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हातांना काम देण्याची गरज आहे. तवंदी ते कणगला येथील जमीनींचे भूसंपादन झाले. आता उद्योगांची उभारणी केंव्हा होणार, याकडे युवकांचे लक्ष लागले आहे.