Thu, Jul 09, 2020 23:01होमपेज › Belgaon › मराठी मतदारांच्या घराघरात

मराठी मतदारांच्या घराघरात

Published On: Mar 28 2019 1:37AM | Last Updated: Mar 28 2019 1:37AM
बेळगाव : प्रतिनिधी 

गतवेळच्या निवडणुकीत काँग्रेसला मराठा मतदारांमुळे फटका बसला होता. यंदा मराठा युवकांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची भूमिका समजावून सांगून त्यांची मते पक्षाकडे वळवू, असा विश्‍वास वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, शहराध्यक्ष राजू शेठ, शिवकांत सिदनाळ आदी उपस्थित होते. गतवेळी काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांना मराठी मतदारांनी हात  दिल्याने त्याचा पराभव झाला, यावेळी काय खबरदारी घेणार असे पत्रकारांनी विचारता जारकीहोळी म्हणाले, मराठा युवकांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची भूमिका समजावून सांगण्यात येईल.  नवख्या उमेदवारांमुळे काँग्रेस पक्षात बंडखोरी होणार का, असे विचारता ते म्हणाले,  विरुपाक्ष साधुण्णावर आणि शिवकांत सिदनाळ या दोघांच्या नावाची शिफारस केली होती. पक्षश्रेष्ठींनी साधुण्णावर यांची निवड केली. साधुण्णावर यांनी पक्षासाठी निष्ठेने काम केले आहे. त्यांच्या पाठीशी पक्ष आहे. बंडखोरी होणार नाही.

रमेश जारकीहोळी काँग्रेसमध्येच

रमेश जारकीहोळी भाजपमध्ये जाणार आहेत असे कळते, असे विचारता मंत्री जारकीहोळी म्हणाले, ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आगामी निवडणुकीत ते काँग्रेसचाच प्रचार करतील.