Fri, Feb 28, 2020 22:56होमपेज › Belgaon › काहीही हं : सायकलवालाही होईल पंतप्रधान..!

काहीही हं : सायकलवालाही होईल पंतप्रधान..!

Published On: May 09 2018 1:50AM | Last Updated: May 09 2018 8:08AMसुनील आपटे

लहानपणी शाळेत असताना एक धडा होता. याचे शीर्षक होते ‘गांधीजी सायकलपर चढें’. सुरवातीला मुलांना काही वेगळेच वाटले. पण तो पाठ म. गांधी यांच्या निश्चयाची महती अधोरेखित करणारा होता. म. गांधी यांना प्रार्थना सभेसाठी जाण्यास विलंब झाला. यामुळे बाजूलाच असलेली सायकल घेतली आणि ते ते तडक सभास्थानी पोहोचले. आता यात आश्चर्य वाटण्याजोगे काय, असे कुणी म्हणेल. पण यातच त्यांचा थोरपणा दडलेला आहे. म. गांधीजींना सायकल चालवायला येत नव्हती. तरीही ते न पडता चालवत प्रार्थनेला वेळेत पोहोचले. इच्छाशक्‍ती दुर्दम्य असली की असाध्य ते साध्य करिता प्रयास, याचा प्रत्यय तर येतोच, पण तो इतरांसाठी आदर्शही ठरतो. म्हणूनच बापूजी महान. 

पण बापूजींची तळमळ आता कोणात राहिली आहे का? लाल बहादूर शास्त्री पोहत शाळेला जात असत. शास्त्रीजी तर प्रामाणिकपणाचा उत्तुंग हिमालयच होते. त्यांनी कारसुध्दा कर्ज काढून घेतली होती. तो आदर्श आणि असे सच्चे नेते आढळणे केवळ दुरापास्त म्हणावे लागेल. कर्नाटक निवडणुकीत काही गमती जमती पाहायला मिळत आहेत. युवराजांनी तर कमालच केली. त्यांनी प्रचारासाठी बैलगाडी वापरली. स्वत: सायकल चालवत मतदारांना हम भी कुछ कम नहीं असे जाणवून दिले.  तर दुसर्‍या एका नेत्याने आणि उमेदवाराने चक्‍क लोटांगण घातले मतदारराजापुढे. आणखी एका उमेदवाराने आपली आश्‍वासने केवळ तोंडी न देता चक्क बाँडपेपरवर लिहून दिली आहेत!

आता युवराजांनी प्रचार करताना सायकलवरून एकदम मोठी झेप घेतली आहे. ते म्हणतात, ‘मी पीएम का होऊ नये?’ पुढील वर्षी काँग्रेस सत्तेवर आली तर मोदी नव्हे मीच पंतप्रधान, असे सांगून युवराजांनी थेट दिल्‍लीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. यामुळे विरोधकांना वेगळा मुद्दा मिळाला आहे, तर पक्षांतर्गत कुजबूज सुरूही झाली आहे. युवराजांच्या मातोश्रींनी याआधीच अध्यक्षपद सोडले होते. शिवाय त्यांनी पंतप्रधानपदाची संधीही सोडली होती. आता युवराजांना त्या पदाचे वेध लागले आहेत.तसे झाल्यास चहावालाच नाही तर सायकलवालाही देशाची सूत्रे सांभाळू शकतो, असा नवा प्रचार गती घेईल. आता युवराजांच्या या नव्या विरोधक कोणती पावले उचलतात, चहावाला काय करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.