Sat, Feb 29, 2020 11:36होमपेज › Belgaon › रणधुमाळीत हरवताहेत जनतेचे मूलभूत प्रश्‍न 

रणधुमाळीत हरवताहेत जनतेचे मूलभूत प्रश्‍न 

Published On: Apr 17 2019 2:03AM | Last Updated: Apr 16 2019 10:37PM
बेळगाव : प्रतिनिधी

लोकसभेची रणधुमाळी सुरु झाल्यापासून अधिकारी व सरकारी कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत. तिकीट आपल्यालाच मिळणार असे गृहीत धरून राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी देखील प्रचाराला सुरुवात केली होती.यामुळे तेव्हापासून आतापर्यंत जनतेच्या मुलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत आहे. 

10 एप्रिल रोजी अचारसंहिता जाहीर झाली. 23 मे पर्यंत अचारसंहिता असणार आहे. यामुळे नवीन कामांना मंजूरी मिळणार नाही. मात्र, जी कामे सुरु झाली आहेत अशी कामे करता येतात. मात्र, अनेक ठिकाणी कामे बंद झाली आहेत. यामुळे जनतेतून रोष व्यक्त केला जात आहे. 

लोकसभा निडवणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून निघाले आहे.  प्रचाराचा वेग दिवसागणिक वाढू लागला आहे. सत्ताधारी व विरोधी एकमेकांवर सभांच्या माध्यमातून  आगपाखड करत आहेत. मात्र, त्यात जनतेच्या प्रश्‍नावर चर्चा होताना दिसत नाही. सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या प्रश्‍नावर कोणीच बोलायला तयार नाही. भावनिक मुद्यांचे राजकारण करीत टीका टिप्पनी केली जात आहे. या चिखलफेकीमुळे लोकशाही धोक्यात येत आहे. 

अधिकारी निवडणूकीच्या कमात व्यस्त असल्याने शहरात अनेक ठिकाणी पडलेल्या कचर्‍याची वेळेवर उचल होत नाही. तसेच तुंबलेल्या गटारी, पिण्याच्या पाणचीही समस्या गंभीर बनली आहे. न्यायालय आवारात मागील आठ ते दहा दिवसांपासून कचरा साचूनच आहे. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

कोलमडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, राष्ट्रीय सुरक्षा,  देशाची एकता आणि अखंडता कायदा व सुव्यवस्था हे देशासमोरील प्रश्‍न आहेत. मात्र, सध्या जनतेला निरर्थक प्रश्‍नांमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. 

सामाजिक प्रश्‍नांऐवजी प्रचाराला भावनिक स्वरुप दिले जात आहे. देशात युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्‍न महत्वाचा बनला आहे. त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. प्रचारातून जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न गायब होताना दिसत आहेत. ऐन दुष्काळात जनता हवालदिल झाली आहे.