Tue, Jan 19, 2021 23:44होमपेज › Belgaon › तिसरी आघाडी करुन आव्हान देणार

तिसरी आघाडी करुन आव्हान देणार

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:40PMबेळगाव :  प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या सहाय्याने तिसरी आघाडी निर्माण करुन कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे माजी पंतप्रधान व निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

निजदने उत्तर कर्नाटकावर व प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यावर आपले विशेष लक्ष केंद्रित केले असून या ठिकाणी जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एच. डी. देवेगौडा यांनी सांगितले. पुढील विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेमध्ये निजदची भूमिका महत्त्वाची असून निजद स्वबळावर सत्तेवर येईल, असा आशावादही त्यांनी प्रकट केला. विधानसभा निवडणूक मेमध्ये होण्याची शक्यता असून उत्तर कर्नाटक, मुंबई कर्नाटक व म्हैसूर विभागामध्ये निजदचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. 

काँग्रेस व भाजपाने निजदला संपविण्याचा घाट घातला आहे. परंतु निजदने अनेक नेत्यांना मोठे केले आहे, हे त्यांनी विसरु नये. विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बहुजन समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निजद राज्यामध्ये बहुजन समाजवादी पक्षाला 20 जागा सोडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जागांसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) व मार्कीस्ट यांच्या बरोबर जागांसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे देवेगौडा यांनी स्पष्ट केले. 

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्‍न संपल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. राज्यातील आयएएस व आयपीएस अधिकारी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निजदतर्फे लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचे देवेगौडा यांनी स्पष्ट केले.