Mon, Sep 21, 2020 23:56होमपेज › Belgaon › ‘नागरिकत्व’ कायदा घटनाविरोधी

‘नागरिकत्व’ कायदा घटनाविरोधी

Last Updated: Jan 15 2020 1:43AM

निपाणी : नागरिकत्व कायदा निषेध सभेला उपस्थित जनसमुदाय.निपाणी : प्रतिनिधी

केंद्रातील भाजप सरकारने  लागू केलेला एनआरसी व सीएए कायदा काळा व घटनाविरोधी आहे. या कायद्याविरोधी सर्वजण  एकत्रित रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी आ. काकासाहेब पाटील यांनी दिला. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी   मंगळवारी  नेहरू चौक येथे काँग्रेस, आरपीआय व समविचारी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर निषेध सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

किरण कोकरे यांनी स्वागत तर प्रास्ताविक नगरसेवक डॉ. जसराज गिरी यांनी केले. सभेला सिटू संघटना, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, निजद, पुरोगामी, दलित, अल्पसंख्याकसह विविध पक्ष व संघटनांंनी पाठिंबा दर्शवित सभेत सहभाग दर्शविला.

माजी आ. पाटील म्हणाले, भाजप सरकारची एकाधिकारशाही आता सर्वांच्याच सहनशक्‍तीच्या पलीकडे गेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन त्यांची जागा दाखवली आहे. ही भाजपच्या र्‍हासाची सुरुवात असून  अशीच परिस्थिती यापुढे देशात दिसून येईल. त्यामुळे अशा घटनाविरोधी कायद्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन लढले पाहिजे. माजी आ. वीरकुमार पाटील म्हणाले, केंद्र सरकारने लागू केलेल्या दोन्हीही कायद्यांना विरोध दर्शविणे ही काळाजी गरज आहे. यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल. त्यामुळे कोणीही मनात भीती अथवा शंका बाळगण्याची गरज नाही. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्‍त केली.

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश कट्टी यांनी, हा कायदा लागू झाल्यास देशात गोंधळ निर्माण होणार आहे. या कायद्यासाठी लोकांना वेठीस धरण्यात येत आहे. केंद्र सरकारला ही प्रक्रिया राबविण्यासाठी एका राज्यासाठी 1300 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे देशविरोधी या कायद्याला सर्वांनी विरोध दर्शवावा, असे सांगितले.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, घटना व देशविरोधी असणार्‍या या कायद्याच्या विरोधातील लढाई तीव्र करण्याची वेेळ प्रत्येकावर आली आहे. त्यामुळे कोणीही याला न जुमानता त्याच्याविरोधात लढले पाहिजे. 

सिटू संघटनेचे अध्यक्ष कॉ.सी. ए. खराडे म्हणाले, 1951 मध्ये अंमलात आलेल्या या कायद्यात दुरूस्ती करण्याची भाजपला  परवानगी कोणी दिली. भाजपने हुकूमशाही पद्धतीने जाती-धर्मात भांडणे लावण्याचे काम चालविले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा कायदा लागू होऊ नये यासाठी अविरतपणे लढण्यात येईल.

यावेळी नगरसेवक विलास गाडीवडर, मोहन बुडके, कॉ. दिलीप वारके, प्रा. बक्‍तियार कोल्हापुरे, निजदचे प्रसन्नकुमार गुजर, शिवसेना जिल्हा प्रमुख बाबासाहेब खांबे, अस्लम शिकलगार, परवीन नायकवडी, माजी ता. प. सदस्या शाहिदा मुजावर, अनिस मुल्ला, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. आय. क्यु. बागवान, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी आदींनी मनोगत व्यक्‍त केले.

सभेला निजदच्या सचिव सुनीता व्होनकांबळे, राजेश कदम, शेतकरी संघटनेचे अनिल संकपाळ, अशोक लाखे, प्रदीप जाधव, पंकज पाटील, श्रेणिक पाटील, हालशगुरचे संचालक सुकुमार पाटील, आण्णासाहेब हावले, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासुद, उस्माणगणी पटेल, नम्रता कमते, सुजाता कोकरे, श्रीनिवास संकपाळ, नगरसेवक संजय सांगावकर, नितीन शिंदे, दीपक वळीवडे यांच्यासह समविचारी पक्ष व संघटनाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

...तर भाजपसाठी महाराष्ट्राचा फॉर्म्युला

महाराष्ट्रात भाजपला कौल मिळूनही महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आले. महाराष्ट्राचा फॉर्म्युला वापरून येत्या काळात कर्नाटकात भाजपला जागा दाखवली जाईल, असा इशारा यावेळी  सर्वपक्षीय नेत्यांनी दिला.

 "