Sat, May 30, 2020 02:34होमपेज › Belgaon › तेलगू, बंगाली भाषिक विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे (video)

तेलगू, बंगाली भाषिक विद्यार्थी गिरवताहेत मराठीचे धडे (video)

Last Updated: Feb 28 2020 1:58AM
बेळगाव : प. य. पालकर

सीमाभागात मराठी भाषा शिकणार्‍यांची संख्या घटत आहे, अशी सातत्याने ओरड होत आहे. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. तरीही मराठी शाळा नेटाने चालवण्याचा उपक्रम अनेक शिक्षक करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हुंचेनहट्टी येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मराठी भाषिक विद्यार्थ्यांबरोबर तेलगू, बंगाली, गुजराती, भोजपुरी व उर्दू भाषिक मुलेही मराठी शिकतात. या शाळेत चक्‍क 21 तेलगू, 21 बंगाली आणि तितकेच भोजपुरी भाषिक विद्यार्थी मराठीचे धडे गिरवत आहेत.

बेळगावपासून जवळच असलेल्या पिरनवाडीच्या पुढे  हुंचेनहट्टी  गाव आहे. या गावात सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा असून या शाळेच्या आजूबाजूला सात शाळा इतर माध्यमांच्या आहेत. अशा परिस्थितीत या शाळेतील शिक्षकांनी मराठी शाळा टिकवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत. मराठी भाषिक पालक इतर माध्यमाकडे वळत असले तरी या भागात इतर परप्रांतीय लोक नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. अशा पालकांची भेट घेऊन त्यांना सरकारी शाळेचे महत्त्व, शाळेत मिळणार्‍या शासनाच्या सुविधा, मराठी भाषेतून शिकल्याचे फायदे पटवून देण्यात या शाळेतील शिक्षक यशस्वी ठरले आहेत. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून एक मुख्याध्यापिका, तीन विषय शिक्षक व एक कन्‍नड भाषा शिकवणारी शिक्षिका आहे.

1970 मध्ये या शाळेची सुरुवात झाली असून यंदा या शाळेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मार्च महिन्यात या शाळेचा सुवर्ण महोत्सव करण्याची तयारी माजी विद्यार्थी करत आहेत. या शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवलेले विद्यार्थी लष्करात कमांडो रँकपर्यंत पोचले आहेत. काही जण सीए बनले आहेत. 

पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट व पायमोजे, गरम जेवण, दूध, शिष्यवृत्ती, विविध आजारांवर औषधे, बसपास मोेफत मिळण्याची सोय या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात. शाळेत शिकणारे विद्यार्थी आपल्या मातृभाषेबरोबर मराठी, कन्नड व इंग्रजी भाषेत बोलू शकतात. 

शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रल्हाद गोसवी असून ते मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते सांगतात. मुख्याध्यापिका एम.बी. कांबळे, सहशिक्षक आर. के. बागेवाडी, एम. एम. कुंभार, डी. व्ही. पाटणेकर, जे. एन बडसकर कार्यरत आहेत.