Thu, Sep 24, 2020 08:22होमपेज › Belgaon › जिल्ह्यात गुन्हेगारीत तासगाव तालुका ‘टॉपर’

जिल्ह्यात गुन्हेगारीत तासगाव तालुका ‘टॉपर’

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 01 2018 7:52PMतासगाव : प्रमोद चव्हाण

तासगाव तालुका गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत गुन्हेगारीत आघाडीवर आहे. गुन्हेगारीच्या  आलेखात तो ‘टॉपर’ आहे. जानेवारी ते जून 2018 या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त गुन्हे तासगाव तालुक्यात घडले आहेत. तालुक्यात गेल्या सहा महिन्यांतच दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 241 आहे. गेल्या पूर्ण वर्षांत 339 गुन्हे दाखल होते. त्यामुळे तालुक्यात पोलिसांनी गुन्हे नियंत्रणासाठी अधिक प्रभावी काम करण्याची गरज व्यक्त होते आहे.

माजी गृहमंत्री (स्व.) आर. आर. पाटील यांनी राज्यातील अवैध धंद्यांना हद्दपार करण्याचा एकेकाळी धडाका लावला होता. त्याची सुरुवात त्यांनी खुद्द त्यांच्या तासगाव तालुक्यातूनच केली होती. मात्र त्यांच्या पश्‍चात तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख चढता आहे. 

जूनअखेर अवघ्या सहा महिन्यात चार खून आणि खुनाचे सातवेळा प्रयत्न झाले आहेत. त्याशिवाय दरोडा, चोर्‍या, घरफोडी यासारखे तब्बल 62 गुन्हे दाखल झाले आहेत. हुंडाबळी, बलात्कार, विनयभंग, जाचहाट असे महिलांसंदर्भातील 23 गुन्हे दाखल झाले आहेत.  एवढ्या मोठ्या प्रमाणात तासगाव तालुक्यात गुन्हेगारी वाढत असताना तासगाव पोलिसांकडून अधिक गांभिर्यपूर्ण कारवाई अपेक्षित आहे. गुन्हे शोधण्याचे प्रमाणही वाढण्याची गरज आहे. 

नगरपालिका पोटनिवडणुकीवेळी तासगाव शहरात भाजप व राष्ट्रवादीच्या समर्थक गटात हाणामारी झाली होती. वातावरण तणावपूर्ण झाले होते.त्यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी धडाडीची भूमिका घेतली होती. त्या भूमिकेचे आजही कौतुक होत आहे. तासगाव पोलिसांनीही तशीच खंबीर भूमिका  घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.

सावळजमध्ये पोलिस ठाणे आवश्यक

तालुक्यातील 69 गावांसाठी गेली अनेक वर्षे केवळ एकच पोलिस ठाणे आहे. सावळजमध्ये  दुसरे पोलिस ठाणे करण्याची मागणी प्रलंबित आहे. खासदार संजय पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी पाठपुरावा केल्यास दुसरे पोलिस ठाणे सहज  मंजूर होईल. एकेकाळी तासगाव पोलिस ठाण्यात सहा ते सात अधिकारी कार्यरत असायचे. सध्या तासगाव ठाण्यात एक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोन पोलिस उपनिरीक्षक आहेत. अनेकदा गुन्ह्याचा  तपास करण्यासाठी अधिकारी उपलब्ध नसतात. त्यातही पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.

जानेवारी ते जून अखेर तासगाव तालुक्यातील गुन्हेगारी 

खून - 4, खुनाचा प्रयत्न - 7, बलात्कार - 1, दरोडा - 2, घरफोडी - 12, जबरी चोरी - 4, चोर्‍या - 44, दंगा, गर्दी मारामारी - 26, दुखापत - 43, अपहरण - 10, हुंडाबळी - 1, विनापरवाना दारू विक्री - 22, गांजा तस्करी - 1, मटका, जुगार - 18, जाचहाट - 10, विनयभंग - 11  केवळ सहा महिन्यात तब्बल 241 गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांचा वचक पुन्हा दिसणे आवश्यक

आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी संपूर्ण राज्यातून मटका, जुगार तडीपार करण्याची मोहीम आखली होती. मात्र त्यांच्या पश्‍चात तासगाव तालुक्यातच अवैध धंदे वाढले आहेत. पोलिसांचा वचक हरवल्याचे चित्र आहे.  जुगार घेणारे  सर्रास फिरत आहेत. मात्र तासगाव पोलिसांना शहरात, तालुक्यात चाललेले हे अवैध धंदे दिसत नाहीत याचे आश्चर्य वाटते. पोलिसांनी त्वरित कारवाई करत या अवैध धंदेवाल्यांना चाप लावणे गरजेचे बनले आहे. तरच तालुक्यात सामाजिक स्वास्थ्य चांगले राहील.

तालुक्यात मटका, जुगार आणि मावा जोरात

तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून जुगार व मटक्याने पुन्हा तोंड वर काढले आहे.  शहरासह तालुक्यात माव्याची सर्रास विक्री सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. प्रत्यक्षात पोलिसांकडे केवळ 18 गुन्हे दाखल आहेत. तसेच यापैकी बरेच गुन्हे हे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या विशेष पथकाने दाखल केले आहेत. त्यामुळे तासगाव पोलिसांना हे मटक्याचे अड्डे दिसत नाहीत का, असा सवाल होत आहे.