Thu, Sep 24, 2020 08:35होमपेज › Belgaon › तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पुनर्रचनेला वेग

तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पुनर्रचनेला वेग

Last Updated: Nov 19 2019 8:14PM
बेळगाव : प्रतिनिधी

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने पुनर्रचनेबाबत निर्णय घेतला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी हा निर्णय झाला असून संघटना मजबुतीसाठी गावपातळीवरून पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे तालुका समितीकडे विभागनिहाय कुणाकुणाची नावे येतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

सीमालढ्यातील ज्येष्ठ अग्रणी नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करण्यात आली. तीच कार्यकारिणी आतापर्यंत कार्यरत आहे. या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली दोन विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये तालुका समितीच्या पदरात निराशाच पडली. आंदोलनाला बळ वाढत गेले, पण मतदानात मात्र फरक पडत गेला. त्यामुळे या दोन्हींची सांगड घालण्यासाठी तालुका समितीत नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी वारंवार होत होती. त्याशिवाय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवर सदस्यांची संख्या कमी होत आहे. काहींचा मृत्यू झाल्यामुळे, काही निष्क्रिय झाल्यामुळे ही स्थिती ओढवली आहे. त्यामुळे घटक समित्यांतून सदस्य पाठवण्याची वारंवार विनंती करण्यात आली. त्यानुसारच आता पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे.

समिती कार्यकर्त्यांनी विभाग किंवा ग्रामपंचायतनिहाय लोकांची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे यामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. याबाबत काही गावांत चाचपणी सुरू झाली आहे. बैठका घेऊन तालुका समितीकडे नावे देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत वरिष्ठांचा हस्तक्षेप नसणार. त्यामुळे कार्यकर्त्यांना आपल्या मर्जीनुसार चांगल्या कार्यकर्त्यांची तालुका समितीवर पदाधिकारी म्हणून निवड करता येणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुका समिती बळकट व्हावी, यासाठी काही जणांकडून प्रयत्न सुरू आहेत. पण, त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुनर्रचना महत्वाची ठरणार आहे.

तालुका समिती पुनर्रचनेचा निर्णय बैठकीत झाला आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या आहे. या पुनर्रचनेत चांगले कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून नियुक्‍त व्हावेत, यासाठी गावागावांतून बैठका घेऊन ती नावे तालुका समितीकडे येणे आवश्यक आहे.
 मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष, तालुका म. ए. समिती

मदत लागली तरच...
तालुका समितीवर निवड करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोकळीक देण्यात आली आहे. त्यामध्ये सध्याचे पदाधिकारी किंवा वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार नाहीत, असे बैठकीत जाहीर करण्यात आले. आवश्यकवेळी मदत लागली तरच वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार आहेत.

येळ्ळूरचा आदर्श ठरावा...
येळ्ळूर विभाग म. ए. समितीने पुनर्रचना करून नव्या दमाच्या नेतृत्वाला वाव दिला आहे. संघटना सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता तालुका समितीवर केवळ टीका न करता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेत सहभागी होऊन समिती बळकट करण्याचा प्रयत्न करावेत, अशी धारणा अनेकांची आहे.

 "