Sun, Sep 27, 2020 00:12होमपेज › Belgaon › पाठिंबा कन्‍नड, पण निष्ठा मराठी गटाशीच

पाठिंबा कन्‍नड, पण निष्ठा मराठी गटाशीच

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 07 2018 12:06AMबेळगाव : प्रतिनिधी

कन्‍नड गटाच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यावर लेखा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळवले असले तरी आपली निष्ठा मराठी गटाशीच आहे, असा दावा वैशाली हुलजी यांनी केला आहे. मराठी गटनेते संजय शिंदे यांनी हुलजी यांना गद्दार ठरवल्यामुळे हुलजी यांनी आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली.

प्रसिद्धीपत्रकात हुलजी यांनी म्हटले आहे ः मी वॉर्ड नं. 27 मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून शहराच्या व वॉर्डातील विकासासाठी तळमळीने काम करीत आहे. लेखा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी मी कन्‍नड गटातील दोन नगरसेवकांचा पाठिंबा घेतला असलो तरी मी सत्ताधारी मराठी गटाचीच नगरसेविका आहे व यापुढेही आपण मराठीशी एकनिष्ठ राहीन. 2014 पासून आपण महापौर, उपमहापौर पदाकरिता इच्छुक होते. परंतु त्यावेळी मला डावलण्यात आले. त्यानंतर मनपा कर व अर्थ स्थायी समितीचे अध्यक्षपद मला देण्यात येणार होते. परंतु मला महापौर म्हणून काम करायचे असल्यामुळे त्या पदाचा आपण विचार केला नाही.  पण त्यावेळी माझी कुणीही दखल घेतली नाही. तेव्हाही मी सत्ताधारी गटाचीच नगरसेविका होते आणि यापुढेही राहीन, असेही हुलजी यांनी म्हटले आहे.

त्यांच्यावर काय कारवाई?

मागील वर्षी कर समितीसाठी मराठी गटातून मी एकटीच इच्छूक होते. परंतु मराठी गटातील दोन नगरसेविकांनी गैरहजर राहून माझा घात केला. त्यामुळे ते अध्यक्षपद विरोधी कन्‍नड गटाकडे गेले. आणखी दोन स्थायी समितीच्या निवडणुकांवेळीही दोन नगरसेविका गैरहजर असल्यामुळे त्या दोन स्थायी समित्याही कन्‍नड गटाला मिळाल्या. त्या नगरसेविकांवर मराठी गटातर्फे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, असेही हुलजी यांनी म्हटले आहे.