Tue, Jan 19, 2021 23:00होमपेज › Belgaon › सहा महिन्यांमध्ये ७ जणांचा बळी

सहा महिन्यांमध्ये ७ जणांचा बळी

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 9:45PMनिपाणी : मधुकर पाटील

अलीकडच्या काळात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसागणिक अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये निपाणी-अकोळ, निपाणी-चिकोडी या मार्गाचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. खडकलाट लक्ष्मी क्रॉस ते निपाणीपर्यंतच्या 9 कि.मी. अंतरावर 6 महिन्यात विविध वाहनांच्या अपघातात 7 जणांचा बळी गेला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.  गतवर्षी नव्याने रूंदीकरण झालेला मुधोळ ते निपाणी हा महामार्ग धोक्याचा बनत चालला आहे.

मंगळवारी निपाणी-चिकोडी मार्गावर कार अपघातात कागल येथील दोघांचे बळी गेले. या अपघाताचे नेमके कारण लक्षात घेता वाहनचालकाने वेगाच्या मर्यादा ओलांडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. आता खेडेगावांना जोडणारे समांतर रस्तेमार्गही धोक्याचे बनले आहेत.  प्रत्येकाला उशिरा निघून निश्‍चित ठिकाणी लवकर पोहचायचे असल्याने अशा जीवघेण्या अपघाताला अनेकांना निमंत्रण मिळत आहे.
पुणे-बंगळूर या राष्टीय महामार्गाचे रूंदीकरण होऊन 14  वर्षाचा कालावधी लोटला आहे. तरीही या 90 कि.मी. टापूत किमान 35 ठिकाणे ही किलर स्पॉट म्हणून गणली गेली आहेत.

रस्ते बांधकाम कंपनीने आवश्यक त्या उपाययोजना करूनही वर्षागणिक वरील टापूत किमान 25 ते 30 जणांचा बळी जात आहे. वाढत्या अपघाती घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून करावे लागणारे उपायही आता तोकडेे पडत आहेत. 

अपघात रोखण्यासाठी स्वत: वाहनधारकांनीही योग्य ती खबरदारी घेणे गरजचे आहे. रस्ते निर्मितीवेळी   दुभाजकाबरोबरच शहरांतर्गत फूटपाथचीही गरज आहे. यासाठी संबंधित रस्ते बांधकाम कंपनीनेही या बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनी वाहने चालविताना खबरदारी घेण्याची गरज आहे.

मंगळवारी चिकोडी मार्गावर कार-ट्रॅक्टरवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांना आपला प्राण गमवावा लागला. सूर्याची किरणे कारच्या काचेवर पडल्याने चालक संभाजी याला पुढील वाहन दिसले नाही. त्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

9 कि.मी मध्ये 7 जणांचा अपघाती मृत्यू

मुधोळ ते निपाणी या रस्त्याचे रूंदीकरण झाल्यानंतर गेल्या अवघ्या सहा महिन्यात निपाणी सर्कलअंतर्गत येणार्‍या खडकलाट व बसवेश्‍वर चौक पोलिस स्थानक हद्दीतील श्री लक्ष्मी मंदिर क्रॉस ते निपाणी बसस्थानक सर्कलपर्यंच्या 9 कि.मी. मध्ये विविध अपघातात 7 जणांचा बळी गेला असून 14 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी झालेल्या कार अपघातात दोघे, गेल्या गुरूवारी झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ऊस वाहतूक वाहनांच्या अपघातात गेल्या चार महिन्यात तिघांचा तर अन्य अपघातात एकाचा बळी गेला आहे.