Fri, Feb 28, 2020 22:41होमपेज › Belgaon › सवदी रॉक.. कत्ती, भालचंद्रना शॉक! 

सवदी रॉक.. कत्ती, भालचंद्रना शॉक! 

Published On: Aug 21 2019 1:30AM | Last Updated: Aug 21 2019 1:30AM
बेळगाव : संजय सूर्यवंशी 

गेली दोन दशके ज्यांच्याशिवाय जिल्ह्याच्या राजकारणाचे पान हलत नाही, ती घराणी म्हणजे कत्ती व जारकीहोळी बंधुंची. परंतु, या दोन्ही घराण्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवून भाजपने पार्टी विथ डिफरन्सची अनुभूती दिली. निवडणूक हरलेले लक्ष्मण सवदी आणि जनसामान्यांचा चेहरा बनत दोनवेळा निवडून आलेल्या निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांना मंत्रीपद देऊन अमित शहा यांनी पुन्हा एकदा आपल्या मुत्सद्देगिरीची चुणूक दाखवून दिली आहे. आपल्याला हवे तेव्हा अन् हवे तसे पक्षांना खेळवणार्‍यांपेक्षा पक्षनिष्ठेला भाजपमध्ये महत्व आहे, हे पक्षाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 

सलग आठवेळा निवडून येत आणि या काळात वेळोवेळी 13 वर्षे मंत्रीपद उपभोगलेल्या उमेश कत्तींना बाजूला ठेवून निवडणूक हरलेले अथणीचे माजी आमदार लक्ष्मण सवदी यांची मंत्रीपदी वर्णी लागते. सलग 20 वर्षे जारकीहोळी बंधूंपासून कधीही न तुटलेले मंत्रीपद त्यांनाही हुलकावणी देते. दुसर्‍यांदा निवडून आल्या तरी जनमाणसात आपली छबी निर्माण करणार्‍या निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांना मंत्रीपद मिळते. या सर्व घडामोडी भाजपमधीलच ज्येष्ठ नेते आणि आमदारांसाठी धक्कादायक आहेत. 

सारेच निकष गुलदस्त्यात 

जे अधिकवेळा आमदार त्यांना मंत्रीपद, हा राजकारणातील सरधोपट आणि अलिखित नियम आहे. परंतु, आताच्या मंत्रीमंडळ यादीत चार ते सातवेळा आमदार झालेले अनेकजण मंत्रीपदापासून वंचित आहेत, तर दोन-तीनदा आमदार झालेल्यांना संधी दिली आहे. शिवाय काँग्रेस-धजदच्या बंडखोर आमदारांपैकी एकालाही संधी दिलेली नाही. त्यामुळे भाजपने मंत्रीपद देताना नेमके कोणते निकष लावले हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे.

कत्ती, जारकीहोळींना शॉक 

हुक्केरी विधानसभा मतदार संघातून सलग 8 वेळा निवडून आलेले उमेश कत्ती यांनी 13 वर्षे मंत्रीपद उपभोगले आहे. स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची सातत्याने मागणी करत या स्वतंत्र राज्याचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहणार्‍या कत्तींना मंत्रीपदापासून वंचित ठेवणे, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. भाऊ रमेश कत्तींना चिकोडी लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर कत्ती बंधू काहीसे काँग्रेसकडे झुकल्याची चर्चा झाली होती. पक्ष बांधणीसाठी कत्ती बंधूंकडून फारसे सकारात्मक प्रयत्न न होणे हे देखील त्यांना मंत्री पदापासून डावलण्याचे कारण मानले जाते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणातून कत्ती बंधू व सवदी हे एकाच पक्षात असूनही राजकीय शत्रू बनले होते. परंतु, आता त्याच लक्ष्मण सवदींना मंत्रीपद दिल्याने कत्ती बंधू अधिकच बॅकफूटवर गेले आहेत. 

जारकीहोळी अन् मंत्रीपद ठरलेलेचगोकाकचे जारकीहोळी घराणे आणि बेळगावचे राजकारण हे गेल्या दोन दशकांपासूनचे समीकरण बनले आहे. एक भाऊ एका पक्षात तर दुसरा अन्य पक्षात असे काँग्रेस, भाजप, निजद तिन्ही पक्षांमधून राजकारण करत सतीश, भालचंद्र व रमेश या तिघा बंधूंनी  स्वतःला सतत सत्तेत फिरते ठेवले आहे. सरकार कोणाचेही असो, जारकीहोळी मंत्री नाहीत, असे गेल्या 20 वर्षात घडले नाही. परंतु, पहिल्यांदाच हे घराणे मंत्रीपदापासून वंचित राहिले आहे. पक्ष नेतृत्वाला अप्रत्यक्ष धमकी देणे, हे राजकारण जारकीहोळी पूर्वीपासूनच करत आले आहेत. रमेश जारकीहोळींमुळे काँग्रेस-निजदचे सरकार कोलमडल्याचे सर्वश्रूत असताना परवा भालचंद्र जारकीहोळी यांनीही क्षुल्लक कारणासाठी भाजपचे सरकार पाडू, असा थेट दमच दिला.  थेट उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करत स्वतःचे वलय निर्माण करून पक्षावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या  भालचंद्र जारकीहोळींना मंत्रीपदापासूनही वंचित राहावे लागले. कोणाच्याच अप्रत्यक्ष धमकीला  भाजप बधले नाही, हे विशेष. 

सवदी हरल्यानंतरही जिंकले 

आपल्या विरोधात अथणीत सिद्धरामय्या जरी थांबले तरी आपण निवडून येऊ, अशा अविर्भावात अथणीचे माजी आमदार लक्ष्मण सवदी होते. परंतु, सवदींना आत्मविश्वास नडला आणि असा काही चमत्कार घडला की काँग्रेसचे नवखे उमेदवार महेश कुमठळ्ळी यांनी त्यांना गतवर्षी हरवले. पचनी न पडणारी हार पाहून सवदी काही महिने विजनवासात गेले खरे. परंतु, भाजपने त्यांच्यातील गुणवत्ता हेरत त्यांना राज्य रयत मोर्चाचे अध्यक्षपद दिले. येथून सवदींनी अशी काही भरारी घेतली की पक्षाच्या प्रत्येक कामात ते सक्रीय राहू लागले. पक्ष बांधणी, आघाडी सरकारमधील नाराज आमदारांना एकत्रित आणून त्यांना मुंबईला नेणे, त्यांच्यात विश्वास निर्माण करणे, हे काम त्यांनी निष्ठेने पार पाडले.  हे सर्व हायकमांड आणि येडियुराप्पांनाही माहिती असल्याने हरल्यानंतरही त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. आपसूकच ते आता जिल्ह्याचे पालकमंत्री होतील. त्यांच्याकडे पूर्वीचेच सहकार व साखर मंत्रीपद येण्याचीही शक्यता आहे. 

शशिकला जोल्ले यांचाही दबदबा 

महिला कोट्यातून निपाणी मतदार संघाला पहिल्यांदाच मंत्रीपदाची ती देखील महिलेच्या रूपाने लॉटरी लागली आहे. जोल्ले वहिनी म्हणून सर्वसामान्यांचा चेहरा बनलेल्या शशिकला जोल्ले यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांनी तर कधीही हार न पाहिलेल्या प्रकाश हुक्केरींना यांना हरवून चिकोडी लोकसभा जिंकली आहे. त्यांचे दिल्लीपासून बंगळूरपर्यंत हे वजन तर आहेच, शिवाय त्यांची आरएसएसशी असलेली जवळीक यामुळे दुसर्‍यांदा निवडून येऊनही त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. एकमेव महिला मंत्री म्हटल्यानंतर त्यांच्याकडे महिला व बालकल्याण खात्याची जबाबदारी येणार हे निश्चित आहे.