जमखंडी : वार्ताहर
जोरदार पावसामुळे छत कोसळून तिघेजण ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी मध्यरात्री बागलकोट जिल्ह्यातील किरसूर येथे घडली. या घटनेत दोघेजण बचावले आहेत.
ईराप्पा हडपद (वय 60), त्यांची पत्नी गौरव्वा ईराप्पा हडपद (55) व मुलगा निंगाप्पा ईराप्पा हडपद (32) हे जागीच ठार झाले. निंगाप्पाची पत्नी सविता व मुलगी या दुर्घटनेतून बचावले आहेत.
शनिवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे बागलकोट जिल्ह्यातील किरसूर येथे घराचे छत कोसळून झोपेत असलेल्या तिघांचा अंत झाला.पोलिस, अग्निशमन दलाचे जवान तसेच नागरिकांच्या सहायाने दगड मातीचे ढिगारे हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री गोविंद काजोरळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच तिघांच्या अंत्यसंस्काराकरिता 15 हजार रुपये तसेच बचावलेल्यांना तात्पुरता निवारा व आहारधान्य पुरविण्यात येऊन नंतर घर बांधून देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने मातीची जुनी घरे असलेल्यांनी सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बागलकोटचे आ. वीरण्णा चिरंतीमठ, जि.पं. अध्यक्षा बायक्का मेटी यांनी घटनास्थळाला भेट देऊन हडपद कुटुंबीयांचे सांत्वन केले.