Sat, Feb 29, 2020 12:12होमपेज › Belgaon › निकाल किती वाजता ही उत्सुकता

निकाल किती वाजता ही उत्सुकता

Published On: May 23 2019 1:40AM | Last Updated: May 22 2019 11:53PM
बेळगाव: प्रतिनिधी

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा निकाल गुरुवारी स्पष्ट होणार असून, प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी पाचपर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, व्हीव्हीपॅटमुळे विलंब होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.   

येथील आरपीडी महाविद्यालयात सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात येणार असून सकाळी पाच वाजता स्ट्रॉग रुमचे सील काढण्यात येणार आहे. त्यानंतर साहित्य कर्मचार्‍यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.  सात वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता प्रथम पोस्टल मतमोजणी करण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी 8.30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत आठ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक पाच व्हीव्हीपॅटची स्लिपांची मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया रात्री 9 पर्यंत चालणार असून याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. एकूण 18 ते 21 मतमोजणीच्या फेर्‍या होणार आहेत. प्रत्यक्षात मतमोजणी आणि इतर कामासाठी सुमारे पाचशे कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून हा आदेश 22 मे रोजी रात्री बारापासून 24 मे रोजी दुपारी बारापर्यंत लागू असणार आहे. 

जनतेच्या माहितीसाठी आरपीडी क्रॉसवर स्क्रिन उभारण्यात आली आहे. यावर प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. विशाल आर. यांनी बुधवारी मतमोजणीच्या ठिकाणी पाहणी केली. त्यांच्यासमवेत केंद्रीय निरीक्षक, निवासी जिल्हाधिकारी एच. बी.  बुद्याप्पा, महापालिका आयुक्‍त इब्राहिम मैगूर आदी उपस्थित होते.  पोलिस आयुक्‍त बी. एस. लोकेशकुमार, उपायुक्‍त सीमा लाटकर यांनीही पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. 

भाजपच्या खोट्या आश्‍वासनांना जनता वैतागली आहे.  यामुळे काँग्रेसला चांगले वातावरण आहे. कार्यकर्त्यांनीही चांगले श्रम घेतले आहे. यामुळे आपला विजय निश्‍चित आहे. -वीरुपाक्षी साधुण्णावर काँग्रेस उमेदवार

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम पाहता जनतेचा मला चांगला पाठिंबा आहे. आपण मतदार संघात राबवलेली विकासकामे, काँग्रेसचा भ्रष्टाचार यामुळे आपला विजय निश्‍चित आहे. अधिक मताधिक्याने आपला विजय होईल. - सुरेश अंगडी भाजप उमेदवार