बंगळूरमध्ये हिंसाचार; ३ ठार, ६० पोलिस जखमी

Last Updated: Aug 12 2020 10:24AM
Responsive image


बंगळूर : पुढारी ऑनलाईन

सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट शेअर केल्यामुळे निर्माण झालेल्या तणावातून बंगळूरमध्ये मोठा हिंसाचार झाला आहे. संतप्त जमावाने काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. यावेळी झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला. तर एसीपीसह ६० पोलिस जखमी झाले आहेत. या हिंसाचार प्रकरणी ११० जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बंगळूर शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. ही हिंसाचाराची घटना मंगळवारी रात्री घडली. 

वाचा : वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही वाटा

काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवासमूर्ती यांच्या भाच्याने फेसबुकवर अपमानजनक पोस्ट टाकली होती. काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली. या पोस्टमुळे तणाव निर्माण झाला आणि मोठ्या संख्येने आलेल्या जमावाने काँग्रेस आमदारांच्या बंगळूर येथील घरावर हल्ला केला. या हल्ल्यात घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट केल्याप्रकरणी संशयित नवीन याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बंगळूर पोलिसांनी दिली आहे.

वाचा : सप्टेंबरमध्येही मुलांना शाळेत पाठवण्यास नकार 

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जमावाने काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. जमावाने घराच्या आवारात असलेल्या १० ते १५ गाड्या पेटवून दिल्या. आमदाराच्या घरालाही आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी जमावाला रोखताना जोरदार धुमश्चक्री झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ११० लोकांना अटक केली आहे. रात्री उशिरा येथील परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरीही येथे अद्याप तणावस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण बंगळूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डीजे हल्ली आणि केजी हल्ली या दोन पोलिस स्थानक क्षेत्रात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.  

वाचा : कोरोनावरील लस खरेदीबाबत आज बैठक

हिंसाचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला असून सुमारे ६० पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या अनेक गाड्या पेटवल्या आहेत. जमावाने बेसमेंट भागातील सुमारे २००-२५० गाड्यांही पेटवून दिल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, अशी माहिती बंगळूर शहर पोलिस आयुक्त कमल पंत यांनी दिली आहे.