Thu, Feb 20, 2020 17:53होमपेज › Belgaon › समस्या माझ्यापुढे अन् मत मोदींना!

समस्या माझ्यापुढे अन् मत मोदींना!

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 27 2019 12:17AM
बंगळूर : प्रतिनिधी

‘मते नरेंद्र मोदींना देता आणि समस्या निर्माण झाल्या की त्या सोडवण्यासाठी माझ्याकडे येता? तुमच्यावर लाठीहल्‍ला करायला हवा का?’ अशी भाषा मुख्यमंत्री एच. डी.  कुमारस्वामी यांनी आंदोलकांसमोर वापरली. बुधवारी रायचुरातील केरेगुड्ड येथे ग्रामवास्तव्यासाठी जात असताना  हा प्रकार घडला. 

वायटीपीएस औष्णिक वीज प्रकल्पाच्या हंगामी कर्मचार्‍यांनी तसेच हट्टी सोने खाण कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची बस अडवली. मुख्यमंत्री कुमारस्वामी जाणार्‍या मार्गावर आधीच आंदोलकांनी ठाण मांडले होते. ते आल्यानंतर आंदोलकांनी ‘मोदी, मोदी’ अशी घोषणाबाजी सुरु केली, तर मुख्यमंत्र्यांविरोधात निषेधाच्या घोषणा सुरू झाल्या. यामुळे संतप्‍त झालेल्या कुमारस्वामींनी आंदोलकांना सुनावले. 

औष्णिक प्रकल्पामध्ये 748 कर्मचारी आहेत. त्यांना चौदा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिवहन मंडळाच्या बसमधून जाणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना पाहिले. पण, त्याकडे दुर्लक्ष करुन ते पुढे जात असल्याचे पाहिल्यानंतर आंदोलकांनी बस रोखली. याआधी समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. अजूनही ते पूर्ण न केल्याबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यात आला. समस्येवर तोडगा काढण्याची ग्वाही दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

मोदींच्या नावाने घोषणाबाजी केल्याने समस्या सुटणार नाही. समस्या सोडवायची असेल तर आपल्यासमोर मोदींचा जप करून काय उपयोग, असे सांगणे चुकीचे आहे का? -एच. डी. कुमारस्वामी, मुख्यमंत्री 

कुमारस्वामी केवळ मंड्या आणि हासनपुरते मर्यादित मुख्यमंत्री नाहीत. आंदोलकांवर लाठीहल्ल्याची भाषा करणे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांची माफी मागावी.-शोभा करंदलाजे, खासदार, उडपी चिक्‍कमंगळूर