Sat, Oct 24, 2020 09:02होमपेज › Belgaon › बेळगाव : तोतया परीक्षार्थी अटकेत 

बेळगाव : तोतया परीक्षार्थी अटकेत 

Last Updated: Oct 19 2020 1:22AM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा व शहर सशस्त्र दल पोलिस भरतीसाठी रविवारी सीईटी झाली. या परीक्षेला बसलेल्या दोघांना तसेच डमी बसविणारा एकजण अशा तिघांवर वडगाव व टिळकवाडी पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. या तिघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 

रविवारी सकाळी शहरातील विविध केंद्रांवर जिल्हा व शहरासाठी घेतल्या जाणार्‍या पोलिस भरती सीईटी परीक्षेला प्रारंभ झाला. अनेक केंद्रांवर शहरातील सहायक पोलिस आयुक्त, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. 

जैन कॉलेजमध्ये परीक्षा देणार्‍या उमेदवारांची तपासणी सुरू असताना एकाबाबत संशय आला. या तरुणाचे ओळखपत्र व अन्य कागदपत्रे तपासताना त्यावर नाव मंजू कट्टीकर (वय 22, रा. राजापूर, ता. मुडलगी) असे होते. परंतु, फोटो मात्र अन्य व्यक्‍तीचा होता. त्यामुळे त्याला परीक्षा हॉलमधून बाहेर काढत वडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. तो कोणाच्या नावे डमी बसला होता, हे समजू शकले नाही.   

टिळकवाडी परिसरातील वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मुडलगीचे निरीक्षक सर्वांची तपासणी करीत असताना येथेही एकजण डमी परीक्षा देत असल्याचा संशय आला. कृष्णा रामचंद्र ऐहोळे (रा. दुरदुंडी, ता. गोकाक) असे त्याचे नाव असून, टिळकवाडी पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. रोहन शंकर जोडट्टी (वय 21, रा. मल्लापूर पीजी, ता. गोकाक) हा परीक्षा देणे आवश्यक होते. परंतु, रोहनने आपला डमी म्हणून कृष्णाला परीक्षेला बसविल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही घटनांचा अधिक तपास वडगावचे निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्‍वर व टिळकवाडीचे निरीक्षक विनायक बडीगेर करीत आहेत. 

साडेपाच हजारांवर उमेदवार

रविवारी शहरातील विविध केंद्रांवर पार पडलेल्या परीक्षेसाठी 6 हजार 909 उमेदवारांनी अर्ज भरले होते. परंतु, यापैकी 5 हजार 760 उमेदवार परीक्षेला हजर राहिल्याची माहिती पोलिस आयुक्तालयाने पत्रकाद्वारे कळविली आहे. 

 "