Thu, Jul 02, 2020 18:38होमपेज › Belgaon › ‘कोरोना’वर तरुणाईकडून फुटले काव्याचे धुमारे

‘कोरोना’वर तरुणाईकडून फुटले काव्याचे धुमारे

Last Updated: Mar 20 2020 8:32PM
बेळगाव: पुढारी वृत्तसेवा

क्या क्या नही करोना, ना हात मिलाना, ना बाहर जाना... गो करोना..अशा ढंगदार कवितांनी सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या गंभीर वातावरणात गीत, कवितांच्या माध्यमातून काळजी घेण्याचे आणि घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा कलात्मक अभिव्यक्तीमुळे हलके फुलके वातावरण तयार होऊन काही क्षण विरंगुळा मिळत आहे.

कोरोनाची सर्वत्र धास्ती असताना आता व्हॉटसअप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर कविता व गीतांची धूम वाढली आहे. हौशी तरूणाई हातात गिटार घेऊन कोरोना गीतांची जंत्री लावत आहे. काहींनी कोरोनावर रिमिक्स गाणी तर काहींनी रॅप साँग तयार केले आहे. तर काहीनी जुन्या चित्रपट गीतांच्या चालीवर गाण्यांची निर्मिती केली आहे. 

बिग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसापूर्वी भोजपुरी भाषेत कोरोना व्हायरसवर कोरोना फिरोना ही कविता लिहिली होती. याच कवितेचे मराठी भाषांतर मराठमोळा अभिनेता सुनिल बर्वे यांनी केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या पसंतीला उतरत आहे. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची करोना गो ये मैने दिया नारा, इसलिए जाग गया था भारत सारा, ही कविता रचली. यानंतर शशी थरूर यांनीही कोरोनावर कविता तयार केली.सीबीएसई बोर्डाने खबरदारीचे उपाय गुणगुणायला लावणारी कविता व्हायरल केली आहे. क्या क्या नही करो ना, असे कवितेचे शीर्षक आहे. उत्कर्ष शिंदे यांचे कोरोनावर आधारित नवे गाणे प्रसिद्ध झाले आहे. त्याचीही चर्चा जनतेत आहे.

वाय दीस कोरोना डिसीज, जल्दी हमको छोडोेना प्लीज, अशा हास्य निर्माण करायला लावणार्‍या व कोरोनाकडे गांभीर्यान पाहायला शिकवणार्‍या कवितांनी जनजागृतीही होत आहे. अशा कविता तयार करण्यात कवींसह कवी नसलेले तरूणही अग्रेसर आहेत. त्यामुळे कोरोनाने जनतशची झोप उडवली असली तरी तरूणाईच्या काव्याचे धुमारे फुटत आहेत. सध्या गंभीर विषयातून जनतेला बाहेर काढण्यासाठी कलात्मक अभिव्यक्ती हे उत्तम माध्यम ठरत आहे.

शाकाहार हाच उत्तम पर्याय, नकोत सध्या मांसाहारी चोचले, काळजी घ्या शरीराची कारण, कोरोना व्हायरस येथे पोहोचले, अशी मराठीतील कविता व्हायरल झाली आहे. काहीजण मास्क लावून ही गाणी शूट करीत आहेत.काहीजण हात धुताना गाणे म्हणत आहेत.काहींनी संगीतासह अशी गाणी पोस्ट केली आहेत. काही तरूण कविता व चारोळ्यामधून लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत. एकंदरीत या कविता नेटिझन्सची मने जिंकत आहेत.तरूणांच्या वर्तमान घडामोडीवरील कल्पकतेमुळे हलके फुलके वातावरण तयार होत आहे.