कुछ भी हो, हम नहीं सुधरेंगे!

Last Updated: Mar 27 2020 1:18AM
Responsive image


बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात केलेल्या लॉकडाऊन आवाहनाला बेळगावकरांनी दोन दिवस चांगला प्रतिसाद दिला; पण जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी महापालिकेने किराणा व होलसेल दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत लोकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. 

जीवघेण्या कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने जमावबंदीचा आदेश बजावला आहे. त्यामुळे मंगळवार आणि बुधवारी शहर परिसरात कर्फ्यूची अनुभूती येत होती.

लोकांना जीवनावश्यक साहित्य कमी पडू नये, यासाठी महानगरपालिका आयुक्‍त जगदीश के. एच. आणि सहायक पोलिस आयुक्‍त नारायण बरमणी यांनी शहरातील हॉटेल व दुकानदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत हॉटेल चालकांनी आहाराचे पार्सल घरपोच पोहोचवण्याची सोय करावी. हॉटेलसमोर पोलिस बंदोबस्त असेल, स्वच्छतेची योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या. होलसेल दुकानदारांनी आणि किराणा साहित्य विकणार्‍यांनी लोकांना जीवनावश्यक साहित्य कमी पडू नये, यासाठी दुकाने उघडी ठेवावीत, अशा सूचना केल्या. दुकानांसमोर गर्दी होणार नाही, यासाठी सामाजिक अंतर राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्यानुसार दुकानासमोर आरेखन करण्यात यावे, असेही सांगण्यात आले. 

काही दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर आरेखनही केले. गुरुवारी दुकाने सुरू होणार आहेत, असे समजताच दोन दिवस प्रशासनाला सहकार्य करणार्‍या लोकांनी घराबाहेर पडून बाजारपेठेत मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, रविवार पेठ, कोतवाल गल्ली आदी परिसरात खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळी रोगाचा सामना करण्यासाठी अत्यावश्यक असलेले सामाजिक अंतर राखण्याचे भानही लोकांत दिसून आले नाही. जीवनावश्यक साहित्याचा तुटवडा पडू देणार नाही असे प्रशासन वारंवार सांगत असले तरी लोक मात्र खरेदीसाठी गर्दी करत असल्यामुळे नाराजी व्यक्‍त होत आहे.

दंडुका पडल्यानंतर सुधारणार का?

मंगळवारी पोलिसाने अनावश्यक घराबाहेर पडून रस्त्यात गर्दी करणार्‍यांवर लाठीमार केला होता. त्यामुळे बुधवारी लोक घराबाहेर पडले नाहीत. पण प्रशासनाने आज खरेदीसाठी सूट दिली असल्यामुळे लोक बाहेर पडले होते. पण बाजारपेठेत मोठी गर्दी केल्यामुळे लोकांनी सामाजिक अंतर राखावे, यासाठी दंडुका चालवावा लागणार का, असा सवाल पोलिस प्रशासनातील अधिकार्‍यांकडून व्यक्‍त होत आहे.