Sat, Feb 29, 2020 11:48होमपेज › Belgaon › ‘कागवाड’च्या विकासासाठी पक्ष बदल : श्रीमंत पाटील 

‘कागवाड’च्या विकासासाठी पक्ष बदल : श्रीमंत पाटील 

Last Updated: Nov 25 2019 11:04PM
एकोणीस वर्षांपूर्वीचा काळ, 2001 सालचा प्रचंड दुष्काळ, कोणताही कारखाना उसाला टनाला 500-600 च्या वर दर द्यायला तयार नव्हता. तेव्हा अथणी शुगर्स लि. ने पहिल्याच गळीत हंगामात उसाला चारअंकी म्हणजे 1000 रु. दर देण्याची घोषणा केली. कारखानदारीतील तो एक विक्रम होता. त्यानंतर राजकारणात उतरलेल्या श्रीमंत पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी  काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवासाबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
- संजय सूर्यवंशी 

प्रश्‍न : काँग्रेसमधून भाजप प्रवेशासाठी तुमच्यासाठी नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली? 
उत्तर : काँग्रेस-निजद आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. परंतु, आपण लोकप्रतिनिधी म्हणून नवीन असल्याने याच्याशी आपले काहीही देणेघेणे नव्हते.  कागवाड  मतदारसंघाचा विकास हे  एकच ध्येय डोळ्यासमोर होते. बसवेश्‍वर पाणी योजना, उन्हाळ्यात कृष्णेला पाणी,  विविध उद्योगधंदे, अशा शेकडो विकासकामांची यादी तयार केली होती. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल परंतु, लहान-मोठी अशी 5 हजार विकासकामांची ब्ल्यू-प्रिंट आपण तयार केली होती. परंतु, मुख्यमंत्री कुमारस्वामी याला अजिबात प्रतिसाद देत नव्हते. ही बाब मी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाही सांगितली. त्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले. परंतु, त्यांनाही यश आले नाही. इतर मतदारसंघातील कामांना मंजुरी मिळत असताना कागवाड मतदारसंघातील कामे मात्र जाणीवपूर्वक पेंडिंग ठेवली जात होती.  अथणी तालुक्यातील 700 कोटींचा ऊस वाळून जात असताना मी त्यांना पाणी देण्यास असमर्थ ठरत होतो, त्यामुळे अस्वस्थ होतो. म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. 

प्रश्‍न : भाजप प्रवेशामुळे तुमचे समर्थक, कार्यकर्ते अन् 
जनतेत संभ्रम आहे, तो कसा दूर करणार?
उत्तर:  अचानक काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आधी संभ्रम होता. परंतु, आता तो दूर झाला आहे. कारण, माझे 90 टक्के समर्थक व कार्यकर्त्यांना माहिती आहे की श्रीमंत तात्या पाटील हे स्वार्थासाठी नव्हे, तर या भागाच्या विकासासाठी आमदार झालेले होते.   सत्तेसाठी नव्हे, तर कागवाड मतदार संघाच्या विकासासाठी राजकारणात आलो आहे, हे कार्यकर्त्यांना पटवून देत आहे. त्यांना ते पटले आहे.  

प्रश्‍न : नवीन पक्षात प्रवेशानंतर जुन्या कार्यकर्त्यांना कसे सामावून घेत आहात? 
उत्तर :  पूर्वीच्या कार्यकर्त्यांसोबत नुकतीच सभा झाली. यामध्ये 80 टक्के कार्यकर्ते सामील झाले होते. तात्या तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे, तर जनतेसाठी निवडणूक रिंगणात आहात. या भागाचा विकास तुमच्याच हातून होणार आहे, याची आम्हाला खात्री आहे. आम्ही सर्वजण तुमच्या पाठिशी राहू, असे खंबीर पाठबळ कार्यकर्त्यांनीच दिल्याने आपला विश्‍वास दुणावला आहे. भाजपचे म्हणाल तर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, के. एस. ईश्‍वराप्पा, सी. सी. पाटील, महांतेश कवटगीमठ, पी. राजीव यासह अनेक नेते खंबीरपणे आपल्या पाठिशी आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना समजावले आहे. 

प्रश्‍न : भविष्यात भाजप आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?
उत्तर: : दीड वर्षे आमदार राहिलो, तेव्हा आघाडी सरकारचे एक वर्ष भांडणातच गेले. त्यामुळे तब्बल 600 किमी प्रवास करून बंगळूरला विकासाच्या फाईली घेऊन गेलो, तरी त्यावर काहीच निर्णय होत नव्हता. परंतु, आता मुख्यमंत्री येडियुराप्पांना आपल्या मतदारसंघासाठी काय हवे, याचा सविस्तर तपशीलच दिला आहे. तीन वर्षांत खिळेगाव-बसवेश्‍वर पाणी पुरवठा योजना पूर्ण करणे, कृष्णेला उन्हाळ्यात पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाशी कायमस्वरुपी करार, कृष्णा काठावरील क्षारपड जमिनीचा प्रश्‍न कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी मोठा निधी, तलाव पुनर्रभरण योजना, वाड्या-वस्त्यांवर रस्ते आणि निरंतर ज्योती वीज अशा अनेक विकासाच्या योजना आताच त्यांच्यापुढे ठेवलेल्या आहेत. त्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिलेले आहे. काहीही करून या योजना मार्गी लावणारच. 

प्रश्‍न : कृष्णा नदीत उन्हाळ्यात पाणी यासाठी काही नियोजन आहे? 
उत्तर:  मी स्वतः कृष्णाकाठचा रहिवासी असल्याने उन्हाळ्यात पाण्याविना येथील लोकांचे काय हाल होतात, हे माहिती आहे. म्हणून यंदा एप्रिल-मेमध्ये होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी फेब्रुवारीपासून प्रयत्न सुरू केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तत्कालीन पाटबंधारे मंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांची भेट घेतली. कोयनेत असलेल्या पाण्यापैकी 4 टीएमसी पाणी मिळावे, शिवाय कर्नाटकातून  पाणी पुढे जाऊन सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांना मिळावे, असा करार व्हावा, यासाठी अनेकदा मुंबई-बंगळूरला फेर्‍या मारल्या. परंतु, तेव्हाच्या आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे याला यश आले नाही. परंतु, भविष्यात हा कायमस्वरुपी करार व्हावा, यासाठी प्रयत्न करून कृष्णेला कधीही पाणी कमी पडणार नाही.

प्रश्‍न : कारखान्याच्या माध्यमातून काय विकासकामे केली?
उत्तर:  कारखाना उभारणीवेळी मी अनेक राजकारणी पाहिले. परंतु, माझ्यासाठी राजकारण तसे नवीनच आहे. मी कधी राजकारण करायचे म्हणून ठरवून आलो नाही. कारखान्याच्या माध्यामातून ऊस उत्पादकांचा विकास  केला.  अनेक बंधारे बांधले, पाणी योजना दुष्काळी भागात पोहोचविल्या. फाऊंडेशनच्या माध्यमांतून गोरगरिबांना जास्तीतजास्त मदत केली. परंतु, कागवाड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर आपण राजकारणात आले पाहिजे, असे समर्थक बोलू लागले. त्यामुळे आता राजकारण करण्यासाठी नव्हे, तर विकास करण्यासाठी राजकारणात आलो आहे.

कुटुंबापेक्षा आणखी काय प्रिय?

16 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर करोडो रुपयांचा घोडेबाजार झाल्याचे माध्यमांमध्ये छापून आले, याची चर्चाही भरपूर झाली. परंतु, मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. आपले कुटुंब आणि विशेषतः आपली मुले ही आपल्यासाठी सर्वात प्रिय असतात. मी माझ्या मुलांच्या डोकीवर हात ठेवून सांगतो की अशा कोणत्याही घोडेबाजाराशी आपला संबंध नाही. भाजपकडून किंवा अन्य कोणा नेत्याकडून कसलीही आर्थिक अपेक्षा ठेवून आपण भाजप प्रवेश केलेला नाही. आधीच्या सरकारने आपल्या मतदार संघातील विकासकामे करण्याकडे केलेले दुर्लक्ष, हे एकमेव कारण यामागे आहे.