Sun, Sep 27, 2020 00:32होमपेज › Belgaon › मदतीच्या हातामुळे ‘पांडुरंगा’ला मिळाली बोटे

मदतीच्या हातामुळे ‘पांडुरंगा’ला मिळाली बोटे

Published On: Sep 25 2019 1:46AM | Last Updated: Sep 24 2019 8:53PM
उचगाव : वार्ताहर

गाव करील ते राव करील काय, असे म्हटले जाते. याची प्रचिती तुरमुरी येथील ग्रामस्थांनी दिली आहे.  ग्रामस्थांच्या मदतीतून गावातील लहानग्या बाळाची चिकटलेली बोटे वेगळी करण्यात आली. 
तुरमुरीतील तरुणांच्या पुढाकाराने लहान मुलाच्या हाताची चिकटलेल्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून बोटे वेगळी करण्यात आली. सदर कुटुंबाला गावातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहाय्य करून सहकार्य  केले. 

तुरमुरी येथील परशराम जाधव यांचा तीन वर्षाचा मुलगा पांडुरंग जाधव याची दोन्ही हातांची बोटे जन्मजात एकमेकाला चिकटली होती. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना उपचार करणे शक्य झाले नाही.  डॉक्टरांनी मुलगा लहान असल्याने शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे सांगितले होते. यामुळे उपचार करण्यात आले नव्हते. 

मात्र पांडुरंग मोठा झाल्याने डॉक्टरकडे विचारणा करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी भरमसाठ खर्च येणार असल्याची माहिती  कुटुंबीयांना  मिळाली. हातावर पोट असणार्‍या  जाधव कुटुंबाला इतका खर्च करणे शक्य नव्हते. 

पांडुरंगची बोटे जन्मजात एकमेकांना चिकटली असल्याने खाणे-पिणे किंवा इतर कोणतीही कामे करण अवघड झाले होते. याची माहिती माजी ग्रा. प. अध्यक्ष मारुती यल्लाप्पा खांडेकर यांना मिळाली. त्यांनी गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मुलाच्या हाताची बोटे शस्त्रक्रिया करून वेगळी करण्यासाठी पुढाकार घेतला.

गावातील तरुणांची बैठक घेऊन मदतीचे आवाहन केले.  मुलाची हाताची बोटे वेगळी करण्यासाठी येणारा  खर्च ग्रामस्थांच्या सहकार्यातून करण्याचा निर्णय घेण्यात आला.  बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. एन. आर. लातूर व डॉ. अमित भाते यांना भेटून सदर मुलाविषयी माहिती दिली.

डॉ. भाते यांनी मुलाची शस्त्रक्रिया आपण अल्प मोबदल्यात करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पुढाकार घेवून  मुलाच्या दोन्ही हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.यासाठी मारुती खांडेकर यांनी दहा हजार, शिवसेना शाखा तुरमुरी यांनी पाच हजार, नागनाथ जाधव, महांतेश बेळगावी, राजु जाधव  यांनी प्रत्येकी दोन दोन हजार रुपयाची मदत केली. 

पांडुरंगाच्या हाताची बोटे जन्मापासून जुळली होती. यामुळे भविष्यात त्याला अडचणीचा सामना करावा लागणार होता. याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यांच्या सहकार्यातून शस्त्रक्रिया करण्यात आली. 
-मारुती य. खांडेकर, ग्रामस्थ.