प्रदेश भाजपमध्ये नाराजीचा स्फोट

Last Updated: Jan 14 2021 1:51AM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर काही क्षणातच मंत्रिपदासाठी इच्छुक असणार्‍यांतून नाराजीचा स्फोट झाला. बसनगौडा पाटील यांच्यासह सुमारे 12 जण इच्छुक होते. त्यापैकी अनेकांनी मंत्रिमंडळाबाबत जाहीर नाराजी व्यक्‍त केली. काही नाराजांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री येडियुराप्पा तसेच इतर ज्येष्ठ नेते समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, बसनगौडा पाटील यत्नाळ, एच. विश्‍वनाथ, तिप्पा रेड्डी, रामदास, महेश कुमठळ्ळी, अरविंद बेल्‍लद, सतीश रेड्डी, नेहरू ओलेकार, रेणुकाचार्य, सोमशेखर रेड्डी, करुणाकर रेड्डी आदींसह 12 आमदार नाराज आहेत. केवळ 20 निष्ठावंत भाजप आमदारांना मंत्रिपदे दिली आहेत. इतर पक्षांतून आलेल्यांना आता अधिक महत्त्व प्राप्‍त झाल्याचा आरोप निष्ठावंत आमदारांकडून केला जात आहे. 

बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी तीन नव्या मंत्र्यांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला आहे. हातात सीडी घेऊन मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. नेतृत्वबदलासाठी पाठिंबा देण्याची मागणी नव्या मंत्र्यांपैकी काहींनी केली होती. येडियुराप्पा यांनी अन्याय केला आहे. त्यांनी जबाबदारी ओळखून पदाचा राजीनामा देण्याची मागणी यत्नाळ यांनी केली.

एच. विश्‍वनाथ म्हणाले, इतर पक्षांतील 17 जणांच्या भिक्षेवर भाजप सत्तेवर आले आहे. सहकार्य केलेल्यांनाच आता डावलण्यात येत आहे. याचा गांभीर्याने विचार व्हावा. पक्षत्याग करताना आपल्याला काही आश्‍वासने देण्यात आली होती. पण, त्यांची पूर्तता झालेली नाही. याबाबत आता कुणाला विचारायचे?

अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी आपल्याला अद्यापही मंत्रिपद मिळाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली आहे. आपल्या मंत्रिपद न देण्याचे कारण मुख्यमंत्र्यांकडे नाही. आश्‍वासनाची पूर्तता होणार तरी कधी? असा प्रश्‍न कुमठळ्ळी यांनी केला आहे.