Wed, Apr 01, 2020 00:37होमपेज › Belgaon › पोलिस कर्मचारी 120; घरे केवळ 36

पोलिस कर्मचारी 120; घरे केवळ 36

Last Updated: Nov 14 2019 9:58PM

संग्रहित फोटोनिपाणी : मधुकर पाटील

पोलिस कर्मचारी 120 आणि घरकुले केवळ 36, अशी अवस्था निपाणी सर्कलची बनली आहे. सध्या निपाणी सर्कलमधील चार पोलिस स्थानकांतील 84 पोलिस कर्मचारी व पाच वरिष्ठ अधिकारी स्वमालकीच्या घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. अजूनही त्यांना काही वर्षे हक्‍काच्या सरकारी घरकुलासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

निपाणी परिसरात शहरासह 62 गावांसाठी शहर, बसवेश्‍वर चौक व ग्रामीण अशी  तीन पोलिस ठाणी कार्यरत होती.चार वर्षांपूर्वी खडकलाट येथे स्वतंत्र पोलिस ठाणे कार्यरत झाले. या स्थानकाच्या मंजुरीसाठी तत्कालीन खा. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांनी प्रयत्न केले. बसवेश्‍वर चौक स्थानक वगळता शहर व ग्रामीण स्थानकाच्या स्वतंत्र इमारती आहेत.

सध्या निपाणी सर्कलमध्ये नव्या तालुक्याच्या रचनेनुसार येणार्‍या 62 गावांसाठी 120 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. खडकलाट स्थानकासाठी 30 तर अन्य तीन स्थानकात 90 पोलिस कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलिस कर्मचार्‍यांच्या संकुलासाठी  4.50 कोटी रुपये निधी मंजूर केला.

शहर स्थानक आवारात दोन निवास संकुले बांधण्यात आली आहेत. या संकुलांचे उद्घाटन 2 रोजी गृहमंत्री बसवराज बोम्मई, महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले, खा. आण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते झाले. बुधवारी नव्या 24 संकुलांचा ताबा कर्मचार्‍यांकडे देण्यात आला. आता एकूण तीन निवास संकुलांमध्ये 36 कर्मचार्‍यांची सोय झाली आहे. खडकलाटसह निपाणी सर्कलमधील उर्वरित 84 कर्मचार्‍यांना सरकारी घरकुले नसल्याने त्यांना भाडोत्री घरात आश्रय घ्यावा लागत आहे.

खडकलाट स्थानक कक्षेत येणार्‍या 30 कर्मचार्‍यांसाठी खडकलाट ग्रा. पं. कडे पोलिस प्रशासनाने जागेची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच या स्थानकाच्या कर्मचार्‍यांसाठी खडकलाटमध्ये  संकुल उभारले जाणार आहे. उर्वरित निपाणी सर्कलमधील  तीन स्थानकातील 54 कर्मचार्‍यांनाही शहर स्थानक आवारातील जुनी घरे जमीनदोस्त करून संकुले बांधली जातील. पण तोपर्यंत त्यांना कर्मचार्‍यांना भाडोत्री घरातच राहावे लागणार आहे. 

निवास संकुल उद्घाटनावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनी निपाणीतील पोलिस ठाण्याच्या इमारती हायटेक होण्यासाठी सभागृहात आवाज उठवून निधी मंजूर करणार असल्याचे सांगितले आहे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून  सर्व कर्मचार्‍यांना हक्काचा निवारा मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पोलिस कर्मचार्‍यांबरोबरच पोलिस अधिकार्‍यांनाही सरकारी निवास संकुले मिळणे गरजेचे आहे. सर्कलमध्ये सीपीआय यांचे निवासस्थान असले तरी बांधकाम जुने झाले आहे. चारही स्थानक प्रमुखांसाठी निवास संकुले नसल्याने भाडोत्री घरात राहावे लागत आहे. अधिकार्‍यांठी निवास संकुले देण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. सरकारने अधिकार्‍यांना हक्‍काची निवास संकुले बांधून द्यावी. 
     - संतोष सत्यनायक, सीपीआय, निपाणी