Tue, Jul 07, 2020 17:25होमपेज › Belgaon › भीषण अपघातात २१ ठार

भीषण अपघातात २१ ठार

Last Updated: Feb 20 2020 11:36PM
बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

बंगळूरहून केरळमधील त्रिवेंद्रमकडे निघालेली बस थांबलेल्या कंटेनरला धडकून 21 प्रवासी जागीच ठार झाले. तर 28 जण गंभीर जखमी झाले. यापैकी काहीजणांची स्थिती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास तामिळनाडूतील अविनाशीनजीक (जि. तिरुपूर) हा भीषण अपघात घडला.

केरळ राज्य परिवहन महामंडळाची (केएसआरटीसी) बस बंगळूर शांतिनगर स्थानकातून सकाळी 8.30 वा. त्रिवेंद्रमच्या दिशेने निघाली होती. अविनाशीजवळ आल्यानंतर बसने थांबलेल्या कंटेनरला ठोकरले. या अपघातात 15 जण जागीच ठार झाले, तर उर्वरित सहाजणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये 15 पुरुष आणि सहा महिला आहे. बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते. प्राथमिक माहितीनुसार चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे समजते. तामिळनाडूकडे जाणारे ट्रक रस्त्याशेजारी उभारण्यात आले होते. त्या ट्रकचे चालक चहा पिण्यासाठी नजिकच्या हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी उलट्या दिशेने आलेल्या केएसआरटीसी बसने कंटेनरला धडक दिली. यावेळी चालकाला डुलकी आली असावी, असा अंदाज आहे. प्रवाशांनी भरलेली बस भरधाव वेगात असतानाच ती धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढचा भाग पूर्ण ट्रकखाली गेला. 

मृत आणि जखमी झालेले सर्वजण पलक्‍कड, एर्नाकुलम, तिरुस्सूर येथील आहेत. मृतदेह तिरपूरच्या सरकारी रूग्णालयात नेण्यात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहेत. केएसआरटीसी बस चालक आणि कंडक्टर यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. टी. डी. गिरेश आणि बैजू अशी त्यांची नावे आहेत. अविनाशीचे डेप्युटी तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातातील मृतांची संख्या 21 आहे. यामध्ये 15 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे. बस बंगळुरूहून तिरूवनंतपुरमला जात असताना हा अपघात झाला. 

केरळचे परिवहन मंत्री ए. के. ससींद्रन यांनी सांगितले की, मृतांमध्ये पलक्कड, त्रिशूर आणि एर्नाकुलमचे प्रवासी होते. समोर आलेल्या माहितीनुसार 48 सीट असलेली ही बस प्रवाशांनी भरलेली होती. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांचं निवेदन

केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने अपघातानंतर निवेदन प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पलक्कडच्या जिल्हाधिकार्‍यांना अपघातग्रस्त लोकांना आपत्कालीन औषधे उपलब्ध करुन देण्याची  सूचना दिली आहे. 

हेल्पलाइन नंबर जारी

गंभीर जखमी झालेल्यांवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी झालेल्या 5 लोकांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. केरळचे अधिकारी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह केरळ येथे पाठविण्यात येणार आहेत. प्रशासनाने कुटुंबांच्या मदतीसाठी 7708331194 हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे.