होमपेज › Belgaon › पुस्तके वाचून मिळते ज्ञान, समाजाचे भान

पुस्तके वाचून मिळते ज्ञान, समाजाचे भान

Last Updated: Oct 14 2019 8:50PM
बेळगाव : शिवप्रसाद आमणगी

15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस निवडला गेला. डॉ. कलमांचे वाचनप्रेम हे सर्वश्रुत आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.  अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे. लेखनाची प्रवृत्ती प्रबळ व्हावी, कल्पना शक्तीला वाव मिळावा. दुसर्‍याच्या दुःखांची जाणीव व्हावी आणि मन संवेदनशील व्हावे, यासाठी वाचन महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनासाठी प्रवृत्त होणे ही काळाची गरज आहे.

शाळा- महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाचे आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होतो, हेच नेमके या उपक्रमातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे. म्हणूनच शाळा महाविद्यालयापर्यंत हा उपक्रम सिमीत न ठेवता आपण सर्वांनी वाचले पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. आजच्या 21 व्या शतकातही हे आपल्याला तंतोतंत पटणारे आहे. आजचा शाळेत जाणारा विद्यार्थी असो वा महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थी. त्यांना टी.व्ही, स्मार्ट फोन, टॅबलेट, कॉम्प्युटर यापासून बाजूला करुन त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. हा दिवस त्या दिनापुरता मर्यादित न राहता नेहमीच पुस्तक, मासिक, साहित्य यांचे वाचन व्हावे.

बुक लव्हर्सचे कौतुकास्पद काम

पाच वर्षापूर्वी काही पुस्तक प्रेमींनी स्थापन केलेल्या बुक लव्हर्स क्‍लब  संस्थेने अल्पावधीतच वाचन चळवळ रूजवण्यासाठी कौतुकास्पद काम केले आहे. चळवळ टिकवण्यासाठी चार वर्षात 500  विविध कार्यक्रम केले आहेत. चला साहित्यावर बोलू काही, वाचनकट्टा, पुस्तक परिचय, शाळांमध्ये वाचन चळवळ रूजवण्यासाठी विविध उपक्रम, चाफाडकर स्मृतीदिन, भाग्यवान विजेता योजना, जादूची पेटी-ग्रंथ पेटी, उत्कृष्ट वाचक सन्मान, साहित्य संमेलनात,  महाविद्यालयीन उपक्रमांत सहभाग याद्वारे  संस्था वाचन चळवळ रूजवत आहे.