Tue, Jul 07, 2020 18:36होमपेज › Belgaon › अब की बार भाजपच की नवा खासदार?

अब की बार भाजपच की नवा खासदार?

Published On: Feb 14 2019 1:33AM | Last Updated: Feb 13 2019 10:42PM
गोपाळ गावडा

कर्नाटक सरकार टिकणार की जाणार, याकडेच सार्‍या राजकीय वर्तुळाचे लक्ष असल्याने येऊ घातलेली लोकसभा निवडणूक अजून तरी खूप दूर वाटते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच हुबळीत सभा घेऊन लोकसभेसाठी भाजपचा बिगुल वाजवला खरा; पण कर्नाटकच्या राजकारणाने गेल्या दोन महिन्यांत असे काही वळण घेतलेय की, काँग्रेस आणि निजद ही युती सरकार टिकवण्यासाठी झगडतेय आणि भाजप सरकार पाडण्यासाठी. त्यामुळे लोकसभेचं नंतर पाहू, असेच चित्र सध्या तिन्ही पक्षांत आहे. तरीही बंगळूरपासून दूर असलेल्या काही मतदारसंघांमध्ये लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

कर्नाटकातून एकूण 28 आणि बेळगाव जिल्ह्यातून तीन खासदार लोकसभेवर निवडून जातात. बेळगाव जिल्ह्यातले दोन महत्त्वाचे मतदारसंघ म्हणजे बेळगाव आणि चिकोडी. सध्या बेळगाव भाजपकडे आहेे; तर चिकोडी काँग्रेसकडे.राष्ट्रीय नेत्यांचा करिष्मा लोकसभेसाठी किती परिणामकारक ठरू शकतो, याचे चपखल उदाहरण म्हणजे बेळगाव लोकसभा मतदारसंघ. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून 2004 पर्यंत बेळगाव मतदारसंघावर वर्चस्व राहिले ते काँग्रेसचे. कधी जवाहरलाल नेहरू, कधी इंदिरा गांधी तर कधी राजीव गांधींकडे पाहून मतदारांनी हा कौल दिलेला; पण, 90च्या दशकात राष्ट्रीय स्तरावर झालेला बदल बेळगावपर्यंत पोहोचण्यास काही अवधी गेला आणि पहिल्यांदा बदल झाला तो 2004 मध्ये. काँग्रेसच्या निष्क्रियतेला कंटाळलेल्या मतदारांनी 2004 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या ‘शायनिंग इंडिया, फील गुड’ मोहिमेत भाजपला कौल दिला आणि व्यापारी असलेले सुरेश अंगडी खासदार बनले. 2009 मध्येही काँग्रेसकडून प्रबळ दावेदार नसल्याने हाच निकाल कायम राहिला. पण अंगडींच्या कामगिरीवर जनता खूश नव्हती. त्यामुळे 2014 मध्ये भाजपात उमेदवार बदलण्यापासून चर्चा सुरू झाल्या. तरीही अंगडींनाच उमेदवारी मिळाली आणि मोदींच्या करिष्म्यामुळे ते निवडूनही आले. 

यंदाच्या निवडणुकीसाठीही खासदार अंगडी भाजप उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. कारण सलग तीनदा निवडून येणार्‍या अंगडींना डावलले गेलेच तर तो भाजपसाठी मोठा निर्णय असेल; पण अलीकडेच राजस्थानात 25 आमदारांना तिकीट नाकारून भाजपने काही प्रमाणात ती ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे सिद्ध केले होते. त्यामुळे येडियुराप्पांचे कट्टर समर्थक शंकरगौडा पाटील, कायदेतज्ज्ञ एम. बी. जिरली, उद्योजक मल्लिकार्जुन जगजंपी अशी काही नावे भाजपकडून चर्चेत आहेत.

काँग्रेसकडे मात्र अजून तरी उमेदवाराची वानवा दिसते. गेल्या निवडणुकीत अंगडींना टक्कर देणार्‍या काँग्रेस महिला राज्याध्यक्ष लक्ष्मी हेब्बाळकर गेल्या वर्षी आमदार बनल्या आहेत. त्यामुळे त्या पुन्हा लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. राज्याच्या राजकारणावर प्रभाव असणारे वनमंत्री सतीश जारकीहोळी लोकसभेच्या रिंगणात उतरले तर ते अंगडींचा पाडाव करू शकतात, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. पण जारकीहोळी लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. अशा स्थितीत पहिल्यांदाच आमदार बनलेल्या मूळच्या कोल्हापूरच्या सूनबाई डॉ. अंजली निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काही काळापूर्वी यंदा लोकसभेची उमेदवारी मराठी भाषिकाला देऊ, असे जारकीहोळींनी जाहीर केले होते. डॉ. निंबाळकर मराठी भाषिक असल्याने बेळगावची मराठी मते त्यांना मिळतील, असा काँग्रेसचा अंदाज आहे. पण तीनदा खासदार झालेल्या अंगडींपुढे डॉ. निंबाळकर नवख्या ठरतील, असेही काँग्रेसमधले काही नेते मानतात. त्यामुळे उमेदवार कोण याची गणिते दोन्ही पक्ष घालत आहेत.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी पाच भाजपकडे आहेत; तर तीन काँग्रेसकडे. त्यामुळे मतदारसंघावर वर्चस्व भाजपचेच आहे. पण राज्यात सत्ता काँग्रेसची असल्याने यंदा हे चित्र बदलण्याची आशा काँग्रेसला आहे. त्यामुळेच काँग्रेस सक्षम उमेदवाराच्या शोधात आहे. मराठी माणसाला उमेदवारी देण्यामागेही हेच गणित आहे. बेळगाव शहरातील मते निर्णायक ठरणार असल्याने आणि बेळगाव शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असल्याने काँग्रेस ही चाल खेळते आहे. तिला किती यश येते हे कदाचित उमेदवार निश्‍चित होताच कळू शकेल. 
गेल्यावेळी 15 लाख 27 हजार मतदार होते. यंदा ही संख्या 16 लाख 40 हजारांवर गेली आहे. गेल्या वेळी विजयाचे अंतर सुमारे 75 हजार होते. यंदा मतदारांची संख्याच 1 लाख 13 हजारने वाढली आहे. त्यामुळे वाढीव मतदानही निर्णायक ठरू शकते. आता प्रतीक्षा आहे ती दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचीच.

बेळगावचा कौल

पक्ष         कितीदा
काँग्रेस        11
जद             1
भाजप         3 
गेल्या तिन्ही निवडणुकांत भाजप

2014 चा निकाल

अंगडी (भाजप) 5.54 लाख
हेब्बाळकर (काँग्रेस) 4.78 लाख


सद्यचित्र असे
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 8 आमदार
आठपैकी भाजपचे आमदार 5, तर काँग्रेसचे 3