होमपेज › Belgaon › गृहनिर्माण प्रकल्पात आता जमीन मालकाचेही नाव 

गृहनिर्माण प्रकल्पात आता जमीन मालकाचेही नाव 

Last Updated: Nov 23 2019 2:00AM

संग्रहित फाेटाेबेळगाव : प्रतिनिधी

गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीवेळी जमीन मालकाचे नाव आणि त्याच्या हक्‍काविषयीची माहिती द्यावी, असा आदेश कर्नाटक रिअल इस्टेट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (के रेरा) जारी केला आहे. गृहनिर्माण व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुतेकवेळा बिल्डरकडून जमीन मालकाचे नाव आणि त्या जमिनीत असणार्‍या मालकाच्या हक्‍काबाबतची माहिती दिली जात नाही. यामुळे व्यवहार पारदर्शकपणे होईल, याची हमी नसते. याविषयी के रेराने गांभीर्याने विचार करुन परिपत्रक जारी केले आहे. दोन महिन्यांपूर्वी याविषयी तज्ज्ञांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या सल्‍ला-सूचनेनुसार नवा आदेश जारी केला आहे. 

गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार्‍या जमीन मालकाचे नाव, त्यांनी बिल्डरबरोबर केलेला करार, प्रकल्पामध्ये असणारे भागीदार आदींबाबत तत्काळ माहिती मिळणार आहे. शिवाय नव्या आदेशामुळे फ्लॅट, घर खरेदी करताना निर्माण होणार्‍या काही समस्याही सुटणार आहेत. बिल्डरांकडून प्रकल्पाची माहिती ऑनलाईन जाहीर केली जाणार आहे. जमीन मालकाचेही नाव जाहीर करावे लागणार असल्याने संबंधित जमिनीबाबत गोंधळ निर्माण होणार नाही. सदर मालकाने बांधकामास परवानगी दिली आहे की नाही, हेही स्पष्ट होणार आहे.

एखादा बिल्डर प्रकल्प हाती घेतो, त्यावेळी त्यामध्ये अनेकजण गुंतलेले असतात. ही माहिती तो जाहीर करत नाही. याआधी अस्तित्वात असणार्‍या कायद्यात संपूर्ण माहिती जाहीर करण्याची सक्‍ती नव्हती. पण, रेराच्या नव्या आदेशामुळे जमीन मालक, भागीदार, संस्थांशी केलेला करार ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायद्याचे उल्‍लंघन होणार आहे. राहण्यायोग्य जागेचे प्रमाणपत्र मिळण्याआधी जमीन मालकाशी झालेल्या व्यवहाराची माहितीही बिल्डरांना जाहीर करणावी लागणार आहे. जमीन मालक व बिल्डर किंवा डेव्हलपर आणि जमीन मालक यांनी संयुक्‍तपणे प्रतिज्ञापत्र सादर करावे. फ्लॅट किंवा घर खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर संबंधितांनी तक्रार केल्यास त्यास बिल्डरांबरोबरच जमीन मालकांनेही उत्तर देणे गरजेचे असणार आहे.

जाहिरातीसाठीही मार्गसूची
केवळ नोंदणीच नव्हे तर जाहिरात करतानाही मार्गसूची लागू करण्यात आली आहे. बिल्डरांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये के रेराच्या वेबसाईटचा उल्‍लेख करावा लागणार आहे. एफएम रेडिओ, इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरात करताना के रेराच्या नोंदणी क्रमांकाचा उल्‍लेख करावा लागेल. फलक किंवा इतर प्रकारच्या जाहिरातीत प्रकल्पाच्या नावाचा जेवढा आकार असेल त्यापेक्षा अर्ध्या आकाराइतका नोंदणी क्रमांकाचा आकार असावा. ठळकपणे तसे नमूद करावे. वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करताना उजव्या बाजूच्या वरच्या कोपर्‍यात नोंदणी क्रमांक प्रसिद्ध करण्याची सक्‍ती असेल.