होमपेज › Belgaon › बेळगावसाठी आता नवे स्मार्ट प्रकल्प

बेळगावसाठी आता नवे स्मार्ट प्रकल्प

Last Updated: Feb 07 2020 10:07PM
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध कामांना चालना मिळाली आहे. आगामी चार महिन्यांत रस्त्यांची कामे पूर्ण होणार आहे. पण, आता नव्याने सहा नवे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये बहुमजली वाहनतळासह इतर प्रकल्प आहेत.

स्मार्ट सिटी योजनेतून बहुमजली वाहनतळ, सोलार प्रकल्प, सार्वजनिक सायकल वापर प्रकल्प आदी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांना बंगळूर येथील बैठकीत स्मार्ट सिटी योजनेचे चेअरमन राकेश सिंग यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे काही दिवसांत या योजना पीपीपी (खासगी भागिदारीतून) साकारण्यात येणार आहेत.

सध्या शहरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या उद्भवत आहे. महापालिकेने बापट गल्‍ली येथे चार कोटी रूपयांतून बहुमजली वाहनतळ उभारण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्यासाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पुन्हा महापालिकेकडूनच पार्किंगची सोय करण्यात आली आहे. याशिवाय मोडका बाजार येथील लक्ष्मी मार्केट वाहनतळ, जिल्हा रूग्णालयासमोर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. असे असले तरी, अद्याप पार्किंगची समस्या सुटलेली नाही. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून ही समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

सार्वजनिक सायकल वापर प्रकल्प म्हैसूर येथे यशस्वी ठरला आहे. त्यामुळे हा प्रकल्प बेळगावतही साकारण्यासाठी स्मार्ट सिटी योजना आग्रही आहे. सायकल पुरवठा करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करणे, शहरातील विविध भागांत सायकली लोकांसाठी ठेवणे, लोकांना अनामत रक्कम ठेवून सायकलचा वापर करता येणार आहे. त्यामुळे वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघेल, असा आशावाद स्मार्ट सिटी योजनेला आहे.

महापालिकेसह सर्व सरकारी कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. 30 मेगा वॉट वीज निर्मितीसाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. सध्या अनेक सरकारी कार्यालयांवर सोलार पॅनेल बसवण्यात आले आहे. पण, हा प्रकल्प व्यापक प्रमाणात असणार आहे. याशिवाय व्यापारी संकुलाचा प्रकल्पही लवकरच हाती घेण्यात येणार आहे.