Sat, Sep 26, 2020 23:47होमपेज › Belgaon › महापालिका बजावणार प्रसूतिगृहांना नोटीस

महापालिका बजावणार प्रसूतिगृहांना नोटीस

Last Updated: Nov 15 2019 10:36PM
बेळगाव : प्रतिनिधी

जन्म दाखल्यात होणार्‍या चुका टाळण्यासाठी महापालिका शहर परिसरातील रुग्णालयांना नोटीस पाठवणार आहे. त्यामध्ये रुग्णालयांत जन्म घेणार्‍या मुलांच्या पालकांचे आधारकार्ड सक्तीचे करण्यात येणार असून आधार कार्डवर असलेल्या नावानुसार नोंद करण्याची सूचना करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या जन्म?मृत्यू दाखला वितरण कक्षासमोर रोज मोठी रांग लागलेली असते. त्यामध्ये नावातील चुका दुरूस्त करण्यासाठी आलेल्या लोकांची संख्याही मोठी असते. दुरूस्तीसाठी पालकांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. शिवाय महापालिकेला जुने रेकॉर्ड काढून नावाची खात्री करावी लागते. या वेळखाऊ प्रक्रियेमुळे कामात संथपणा आला आहे. त्यामुळे लोकांशी वादावादी होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

हे प्रकार टाळण्यासाठी शहर परिसरातील रूग्णालयांना नोटीस पाठवण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे. जन्म घेणार्‍या मुलांच्या पालकांची नावे चुकू नयेत, यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात यावे. आधार कार्डवर ज्या प्रकारे नाव आहे, तशाच प्रकारे नोंद करून घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात येणार आहे.

रूग्णालयातील नोंदी महापालिकेकडे पाठवल्या जातात. त्यामुळे जन्म दाखले देताना रूग्णालयात ज्याप्रकारे नाव आहे, तसेच नाव दाखल्यात येते. पण, अनेकदा रूग्णालयात चुकीच्या पध्दतीने नाव सांगितले जाते किंवा चुकीच्या पध्दतीने नोंद केले जाते. त्याचा फटका नंतर पालक आणि पाल्यांना बसत असतो. सध्या शालेय प्रवेश आणि परीक्षा प्रक्रिया ऑनलाईन होत असल्यामुळे नावात फेरफार झालेला असल्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नावांची दुरूस्ती करून घेण्यासाठी  लोकांची महापालिकेसमोर गर्दी होत आहे. हे टाळण्यासाठी आता महापालिका आरोग्य विभागाने शहरातील सर्व प्रसुतीगृहांना नोटीस बजावून नाव नोंदणीसाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

जन्म दाखल्यातील चुका दुरूस्त करून घेण्यासाठी महापालिकेकडे लोकांची वर्दळ अधिक आहे. ऐन परीक्षा किंवा इतर वेळी ही घाई करण्यात येते. अनेकदा न्यायालयात जाऊन आदेशपत्र घ्यावे लागते. पण, सध्या ऑनलाईनचा काळ असल्यामुळे प्रसूतिगृहांनीच योग्य प्रकारे नावांची नोंद करावी, यासाठी त्यांना नोटीस पाठवणार आहे.
डॉ. संजय डुमगोळ, आरोग्याधिकारी, महापालिका

 "