Thu, Oct 17, 2019 23:34होमपेज › Belgaon › आ. हेब्बाळकर उद्या ‘ईडी’समोर 

आ. हेब्बाळकर उद्या ‘ईडी’समोर 

Published On: Sep 18 2019 1:51AM | Last Updated: Sep 18 2019 1:51AM
बेळगाव : प्रतिनिधी

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना सक्‍तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस जारी केली आहे. 19 सप्टेंबर रोजी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोटिसीत असून, त्यासाठी मंगळवारी सायंकाळी आ. हेब्बाळकर बंगळूरला रवाना झाल्या. तेथून त्या दिल्लीला रवाना होणार आहेत. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांची ईडीने चौकशी करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीने त्यांची मुलगी ऐश्‍वर्या यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार ऐश्‍वर्याची चौकशीही झाली. 

आता बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीचा सामना करण्याची तयारी आ. हेब्बाळकरांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी शिवकुमार यांच्यावर प्राप्‍तिकर विभागाचा छापा पडला होता. त्या काळात आ. हेब्बाळकर यांनी डी. के. शिवकुमार यांनी शेवटी फोनद्वारे संपर्क साधला असल्याची माहिती प्राप्‍तिकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार हेब्बाळकर यांना ईडीने नोटीस पाठविल्याचे सांगण्यात येते. 

यापूर्वीही आ. हेब्बाळकर यांना ईडीने नोटीस पाठवली होती. परंतु, त्यांनी पुढील तारीख मागून घेतल्याचे समजते. आता पुन्हा ईडीने नोटीस पाठवून 19 सप्टेंबर रोजी दिल्लीत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. मंगळवारी सायंकाळी त्या बेळगावातून बंगळूरला रवाना झाल्या. तेथून त्या दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.