Sat, Feb 29, 2020 18:07होमपेज › Belgaon › निपाणी नगरपालिका निवडणूक : आजी-माजी आमदारांच्या सहभागाने रंगत

निपाणी नगरपालिका निवडणूक : आजी-माजी आमदारांच्या सहभागाने रंगत

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:28PMनिपाणी : राजेश शेडगे

येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात प्रचाराचा धुरळा उडत आहे. या निवडणुकीत गत दोनवेळा निवडणुकीत विजयी झालेले काही माजी नगरसेवक व माजी पदाधिकारी आणि त्यांच्या सौ. पुन्हा आपले भविष्य आजमावत  आहेत. त्यामुळे या प्रस्थापितांना यंदाच्या निवडणुकीत चांगले आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. 

माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी यांनी शहरविकास आघाडीकडून तर आ. शशिकला जोल्ले व सहकारनेते अण्णासाहेब  जोल्ले यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी वॉर्डांमध्ये फिरून पचार चालविल्याने निवडणुकीत रंग भरला आहे.

निवडणूक रिंगणातील बहुतांश उमेदवारांनी कॉर्नर सभांवर भर दिला आहे. गत नगरसेवकांनी केलेल्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहेत. माजी नगरसेवकांकडून आपण केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला जात आहे. कॉर्नर सभेत होणार्‍या टकिांना नागरिकांतून चांगली दाद मिळत आहे. भाजपने कॉर्नर सभेचे नियोजन केले असून ठिकठिकाणी कॉर्नर सभा सुरु आहेत.

जाहीरनामा

भाजप व शहर विकास आघाडीने जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये 24 तास पाणीपुरवठा,  राजा शिवछत्रपती स्मारकाचे काम पूर्ण करणे, उद्यान निर्मितीला चालना, भ्रष्टाचारमुक्त कारभार, शाश्‍वत विकासकामे राबविणे, अंत्ययात्रेसाठी मोफत दहन योजना, वैकूंठ स्मशानभूमी व वेदगंगा नदीवर घाट  निर्माण, जवाहरलाल तलाव व हावेली तलावाचे सुशोभिकरण अशा मुद्यांना प्राधान्य दिले आहे.

कागदोपत्री हा जाहीरनामा वजनदार वाटत असला तरी हुकूमशाही, भ्रष्टाचार, गुंडप्रवृत्ती आणि धनदांडग्यापासून शहर मुक्त होणार का, याची वाच्यता मात्र कोठेही नाही. तरीही शहरात प्रचाराची रणधुमाळी इर्षेला पेटली आहे. नागरी समस्या व प्रश्‍नांचा अभावानेच उल्लेख होत आहे. अनेक वॉर्डात प्रचारासाठी विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. दुर्लक्षित नागरिकांनाही सन्मानाने बोलावले जात आहे. शहरातील अटी-तटीच्या काही वार्डात कार्यकर्त्यांची दिवाळीच सुरु आहे.  

निवडणुकीत निजद, बसपा व शिवसेनेचे उमेदवार असले तरी त्यांचा जोर अभावानेच दिसून येत आहे. छोट्या पक्षांची अस्तित्वासाठी धडपड सुरु आहे. या पक्षाच्या उमेदवारांना पडणारी मते कोणाला धक्का देणार, हा  चर्चेचा विषय झाला आहे. 

अनेक प्रभागांत 5 ते 10 उमेदवार  संख्या असल्याने मतांची विभागणीच निर्णायक ठरणार आहे. नेतेमंडळी आकडेमोडीचे डावपेच करीत आहेत.  घरातील उमेदवाराचा विजय  होण्यासाठी सारे कुटूंबच प्रचारात उतरले असल्याचे चित्र अनेक उमेदवारांच्या बाबतीत दिसत आहे. कोणाची पत्नी, कोणाची भावजय तर कोणाची आई निवडणुकीच्या रिंगणात असल्याने प्रत्येकांनी आपल्या घराची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लावली आहे.