होमपेज › Belgaon › निपाणी तालुका आजपासून कार्यान्वित

निपाणी तालुका आजपासून कार्यान्वित

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 11:56PMनिपाणी : प्रतिनिधी

शहराची तालुका म्हणून घोषणा  झाली असून प्रत्यक्ष कामकाजाला डाक बंगला आवारातील जुन्या विशेष तहसील कार्यालय इमारतीत आज सोमवारपासून सुरुवात होणार आहे.
 अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचीही नियुक्‍ती गेल्या आठवड्यात झाली. इमारतीची रंगरंगोटी, फर्निचर या बाबी पूर्ण होऊन इमारतीसमोर ‘तालुका निपाणी’ बोर्ड झळकला होता. आज सकाळी 11 वा. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी, आ. शशिकला जोल्ले, वीरकुमार पाटील, काका पाटील, सुभाष जोशी आदींच्या उपस्थितीत कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचे उपतहसीलदार एन. बी. गेज्जी यांनी सांगितले.

काका पाटील यांच्या आमदारकीच्या  काळात येथे विशेष तहसील कार्यालयाची स्थापना  झाली. त्यांनी तालुका कार्यरत होण्यासाठी पाठपुरावा केल्याने सरकारने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात निपाणी तालुक्याची घोषणा केली. त्यावेळी राज्यात 49 तालुक्यांची घोषणा करण्यात आली; मात्र तालुका रचनेसाठी अंतिम गॅझेट प्रसिद्ध करताना 29 तालुकेच घोषित झाले. 

निपाणीला यातून वगळण्यात आले. याचा सर्व स्तरातून निषेध झाला. लोकभावनेची दखल घेऊन पुन्हा निपाणी तालुक्याचे गॅझेट प्रसिद्ध झाले. हरकती मागवून अंतिम गॅझेटमध्ये तालुक्याचा समावेश करण्यात आला. उपतहसीलदाराची जुनी  कार्यालय इमारत  कामकाजासाठी सज्ज झाली आहे. इमारतीला रोषणाई केल्याने नवी झळाळी आली आहे. या इमारतीत गे्रड-1 तहसीलदार, ग्रेड-2 तहसीलदारासाठी स्वतंत्र कक्ष व कोर्ट हॉल होणार आहे. सर्व विभागांसाठी स्वतंत्र कक्ष असतील.