Sat, Feb 29, 2020 11:14होमपेज › Belgaon › बेळगाव, हुबळी,धारवाडला नवे उद्योग

बेळगाव, हुबळी,धारवाडला नवे उद्योग

Last Updated: Nov 15 2019 10:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

बंगळूर शहराला मोकळा श्‍वास घेण्यासाठी कर्नाटक शासन राज्यात हुबळी-धारवाड, बेळगाव, तुमकूर, दावणगिरी आणि गुलबर्गा येथे नवी उद्योग केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. क्रेडाई कर्नाटकच्या स्टेटकॉन-2019 वार्षिक परिषदेत बोलताना लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी  ही माहिती दिली. ते म्हणाले,  सरकार लवकरच नवीन औद्योगिक धोरण आणणार आहे. त्यानुसार द्वितीय दर्जा आणि तृतिय दर्जा शहरांना महत्व येणार आहे. आतापर्यंत उद्योगधंदे आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्या या बंगळूमध्येच केद्रीभूत आहेत. आता राज्यातील दुसर्‍या शहरांमध्येही उद्योगधंदे वाढीसाठी चालना देण्यात येणार आहे. लवकरच राज्यसरकार औद्योगिक पॅकेज जाहीर करणार आहे. राज्यसरकार अन्य शहरात उद्योगवाढीसाठी जमीन आणि सुविधा उपलब्ध करून देणार आहे. 

हुबळी-धारवाड, बेळगाव, तुमकूर, दावणगिरी आणि गुलबर्गा या शहरांना सुविधा मिळण्यासाठी सरकार हुबळी आणि गुलबर्गा येथील विमानतळांचा विकास करणार आहे, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्‍वथनारायण म्हणाले, नीती आयोगाच्या सूचनांनुसार आणि उत्कृष्ट सेवा देऊन जगातून गुंतवणूक वाढीसाठी मेक इन कर्नाटकला आणखी सक्षम करण्यात येणार आहे. रियल इस्टेट डेव्हलपर्सना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. क्रेडाई कर्नाटकचे ए. बालकृष्ण हेगडे यांनी राज्यसरकारकडे तेलंगणासारखी 1 टक्का स्टँप ड्युटी आकारावी अशी मागणी केली. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात फ्लॅट घेऊ शकतील. तसेच व्यवसायवाढीसाठी परवान्यांचे सुलभीकरण करणे आवश्यक आहे.

गुलबर्गा-बंगळूर विमानसेवा 22 पासून

केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत गुलबर्गा-बंगळूर ही नवीन विमानसेवा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तिरूपतीलाही उत्तर कर्नाटकला जोडण्यासाठी विमानसेवा सुरू केली जाणार आहे.