Sat, Feb 29, 2020 19:33होमपेज › Belgaon › कर्नाटकातही डिटेंशन सेंटर

कर्नाटकातही डिटेंशन सेंटर

Last Updated: Dec 25 2019 1:37AM
बंगळूर ः प्रतिनिधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप देशात कुठेही डिटेंशन सेंटर (घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठीची छावणी) सुरू करण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले होते. तथापि, आसाम, कर्नाटकातही डिटेंशन सेंटर सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये डिटेंशन सेंटर सुरू करण्याची तयारी सरकारने चालविली आहे.

आसाममध्ये तर एका मोठ्या परिसरात शाळा, वैद्यकीय सुविधा आदींनी सुसज्ज अशा डिटेंशन सेंटरची इमारत उभारली जात असल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झालेले आहे. बंगळूर तसेच मुंबई या महानगरांमध्ये  विविध देशांचे नागरिक बेकायदा राहात असल्याचे प्रमाण मोठे असल्याने या (एनआरसी अंतर्गत बेकायदेशीर ठरणार्‍या लोकांना स्थानबद्ध करण्यासाठी) बंगळूर आणि मुंबई दोन्ही ठिकाणीही डिटेंशन सेंटरसाठीची पूर्वतयारी झालेली आहे. अर्थात, अद्याप इथे कोणत्याही देशातील

 नागरिकांना स्थानबद्ध करण्यात आलेले नाही. बंगळूरपासून 40 कि.मी. अंतरावर असलेल्या नेलमंगलाजवळ डिटेंशन सेंटर उभारण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात मात्र सरकार बदलल्याने मुंबईतील डिटेंशन सेंटरचे काम थंड बस्त्यात पडल्याचे सांगितले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर सभा झाली. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व कायदा मुस्लिमांविरोधात नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. देशात कोणत्याही ठिकाणी डिटेंशन सेंटर सुरू करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले. 

दुसरीकडे कर्नाटकात घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठी डिटेंशन सेंटर उभारल्याची माहिती समाज कल्याण खात्याचे आयुक्त  आर. एस. पेद्दप्पया यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिलेली आहे. कर्नाटक सरकारच्या गृहखात्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍यानेही त्यास दुजोरा दिला आहे.

कर्नाटकात हे डिटेंशन सेंटर जानेवारी महिन्यात उभारण्याचा सरकारचा प्रयत्न होता. तथापि, केंद्र सरकारच्या काही सूचनांमुळे ते उभारण्यास विलंब लागला. मात्र, हे सेंटर सुरू झाल्यापासून अजून एकाही घुसखोराला या सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले नाही. 

विदेश प्रादेशिक नोंदणी कार्यालयाद्वारे परकीय नागरिकांचा तपास करून त्यांच्या निवासाची सुविधा अशा सेंटरमध्ये केली जाणार आहे. सेंटरमध्ये सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, असे पेद्दप्पया म्हणाले. 

35 तात्पुरते डिटेंशन सेंटर

कर्नाटकातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 35 तात्पुरते डिटेंशन सेंटर असल्याची माहिती याआधीच कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाला दिली होती. विदेशी कायद्यांतर्गत राज्य सरकारने आतापर्यंत 612 प्रकरणांचा छडा लावला असून विविध देशांचे 866 नागरिक कर्नाटकात आढळून आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.