Tue, Sep 22, 2020 01:26होमपेज › Belgaon › निवडणुकीनंतर सर्वच विजेत्यांना मंत्रिपदे

निवडणुकीनंतर सर्वच विजेत्यांना मंत्रिपदे

Last Updated: Nov 24 2019 1:36AM
अथणी, शिरगुप्पी : प्रतिनिधी

पोटनिवडणुकीनंतर सर्वच  जेत्या अपात्र आमदारांना मंत्रिपद देऊ, त्याबरोबरच अथणी-कागवाडला आणखी दोन पदे देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शनिवारी अथणी आणि शिरगुप्पी येथील प्रचारसभांमध्ये दिली. 

राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणार असून, कागवाड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्याबरोबरच पोटनिवडणुकीतील सर्व 15 जागा भाजप जिंकेल, असेही येडियुराप्पा म्हणाले. 

शिरगुप्पीतील सभेत व्यासपीठावर उमेदवार श्रीमंत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खाणमंत्री सी. सी. पाटील,  माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, केंद्रिय रेल्वेमंत्री सुरेश अंगडी, खास. प्रभाकर कोरे, महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, विधानपरिषदेचे मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ आम. उमेश कत्ती, आम. पी. राजीव,  भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत नाईक होते. 

येडियुराप्पा म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस निधी निवडणुकीच्या निकालानंतर दिला जाईल.  अथणी व कागवाड तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला बसवेश्वर पाणीप्रकल्प व तलावभरण प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन आणि येत्या तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करू.
उपमुख्यमंत्री सवदी म्हणाले, कागवाड व अथणी येथील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याने तळमळीने कार्य केले पाहिजे.  2 डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची पुन्हा सभा होणार असून त्या सभेतच आम्ही कागवाड आणि अथणीता निकाल जाहीर करू.

 भाजपप्रवेश ऐनापूर येथील राजेंद्र पोतदार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. त्यांना येडियुराप्पांनी भाजपाचा झेंडा देऊन स्वागत करण्यात आले.  यावेळी किरण पाटील, अभयकुमार अकीवाटे यांच्यासह कागवाड मतदारसंघातील भाजपप्रणित ग्रामपंचायत सदस्य, भाजप कार्यकर्ते विविध पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोकाकमध्येही सभा रमेश जारकीहोळी यांच्यामुळेच आपण पुन्हा मुख्यमंत्री झालो आहे, असा पुनरूच्चार मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केला. शनिवारी येडियुराप्पांची पहिली सभा गोकाकमध्ये झाली. तिथे ते म्हणाले, रमेश आणि काँग्रेस-निजद सोडून भाजपमध्ये आलेल्या 15 आमदारांमुळे मला मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या सगळ्यांना मंत्रिपद देऊन त्यांचे आभार मानू. 

याआधी बंगळुरातील सभेत अपात्रांमुळेच आपण मुख्यमंत्री झालो, असे येडियुराप्पा यांनी जाहीर केले होते. आता बेळगाव जिल्ह्यात पुन्हा येडियुराप्पा यांनी रमेश जारकीहोळी यांच्यामुळे आपण मुख्यमंत्री झालो असल्याचे सांगितले.

 "